धुळे : धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडामधल्या सामूहिक हत्याकांडाचा अंगाला शहारे आणणारा व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागलाय...मात्र या मारहाणीची दृश्यं तुम्हाला विचलीत करू शकतात म्हणून आम्ही संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही. राईनपाड्यात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या पाच जणांना एका खोलीत बंद करून बेदम मारहाण केली. या दृश्यांमध्ये पाहिल्यानंतर ही माणसं नव्हेत तर हैवानच असल्याचं दिसतं. यातला मुख्य आरोपी असलेल्या महारू पवारनं तर हातात येईल त्या वस्तूनं या निर्दोषांवर प्रहार केले. लोखंडी दांडा, खुर्ची, लाकडाचे दंडुके अशा अनेक वस्तुंनी त्या तुटेपर्यंत निर्दयीपणे मारहाण केली.
राईनपाडा हत्याकांड प्रकरणी २४ आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. साक्री न्यायालयाने हा निर्णय दिलायं. रविवारी सकाळी धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा गावात मुलांना पळवणारी टोळी समजून जमावानं पाच जणांना बेदम मारहाण केली. त्यात पाचही जणांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात हे पाच जण सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातून भिक्षा मागण्यासाठी रानाईनपाड्य़ात आले होते.
राईनपाडा हत्याकांडाचा मुख्य आरोपी महारू पवारला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. कोकणीपाडा येथुन नातेवाईकाच्या घरातून त्याला अटक करण्यात आली आहे. धुळे तालुका पोलिसांच्या पथकाला तपासात मोठं यश आलं आहे. आरोपींना आश्रय देणाऱ्यावरही पोलीस गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.