महाड येथील प्राचार्य पदाचा वाद विकोपाला, आंबेडकर महाविद्यालयाची तोडफोड

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्य पदाचा वाद विकोपाला गेला आहे.  

Updated: Dec 26, 2019, 05:28 PM IST
महाड येथील प्राचार्य पदाचा वाद विकोपाला, आंबेडकर महाविद्यालयाची तोडफोड title=

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्य पदाचा वाद विकोपाला गेला आहे. राडेबाज प्राध्यापकांनी महाविद्यालयाची तोडफोड केली आहे. लाठ्या काठ्या दगडांचा मुक्त वापर करण्यात आला आहे. या मारहाणीत सहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महाडच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये गुरुवारी प्राध्यापकांच्या दोन गटांत जोरदार राडा झाला. प्राध्यापकांच्या या हाणामारीत सहा जण जखमी झालेत. प्राचार्यपदावरून सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडला. यावेळी दोन्ही गटांनी लाठया काठया आणि दगडांचा मुक्तपणे वापर केला. या तोडफोड आणि दगडफेकीत कॉलेजचं मोठं नुकसान झाले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या प्राचार्यपदाचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. असं असताना दोन दिवसांपूर्वी सुरेश आठवले यांनी सध्याचे प्राचार्य धनाजी गुरव यांच्या दालनाचा ताबा घेतला आणि ते स्वतः प्राचार्य म्हणून काम पाहू लागले. यामुळे गुरव गटाने गुरुवारी पुन्हा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही गट आमनेसामने भिडले. याप्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्राध्यापकांमध्ये हाणामारी झाल्याने महाविद्यालयाचे नाव खराब झाले आहे. शिक्षक लोकच असे वागत असतील तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा, अशा प्रतिक्रिया महाडमधून व्यक्त होत आहेत. देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्या नावाच्या महाविद्यालयात अशी घटना घडणे हे निंदाजनक आहे, अशी तीव्र नाराजी परिसरातून व्यक्त होत आहे.