माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार उद्विग्न : शरद पवार

 राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज आहेत.

Updated: Sep 27, 2019, 10:01 PM IST
माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार उद्विग्न : शरद पवार title=

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज असल्याने त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीवादीत भूकंप झाला. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन माहीती दिली. त्यांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही. मात्र, मी कुटुंब प्रमुख असल्याने मला याबाबतची माहिती जाणून घेण्याची माझी जबाबदारी होती. मीही माहीती घेतली. त्यांनी आपल्या कुटुंबातही चर्चा केली. तसेच माझे (काका) नाव महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळ्यात आल्याने ते अस्वस्थ होते. अस्वस्थता आणि उद्विग्नेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असवा, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. 

दरम्यान, मला राजीनाम्याची बातमी मला पुण्याला येताना समजली. मलाही यासंदर्भातली काहीही कल्पना नव्हती. मी त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. त्यावेळी माझ्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याने अजित पवार अस्वस्थ झाले आहेत, असे मला समजले. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना ते सहन झाले नाही. त्याच अस्वस्थेतून त्यांनी राजीनामा दिला असावा. अजित पवार यांच्याशी मी याबाबत चर्चा करेन, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

अजित पवार यांच्या राजीनाम्याची माहिती नाही : शरद पवार

अजित पवार राजीनामा देणार याबाबत कल्पना नव्हती. यासंदर्भात चर्चा झालेली नव्हती. मी कुटुंबप्रमुख म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माझेही नाव राज्य सहकारी बॅंक प्रकरणात आल्यामुळे ते अस्वस्थ होते, असे त्यांनी आपल्या मुलाला सांगितले. आजचे राजकारण आपल्याला न पटणारे नाही, असे अजित पवारांना वाटले. त्यापेक्षा राजकारण्यापासून बाजूला होऊन शेती करू असे त्यांनी मुलाला सांगितले. माझी त्यांची भेट झाली नाही, त्यांच्या चिरंजीवाकडून ही माहिती मिळाली. अजित पवारांनी त्यांच्या चिरंजीवला सांगितले की, तू पण राजकारणात पडू नको, असे पार्थने सांगितले, अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली. 

आताचे राजकारण खालवले आहे. त्यामुळे ते नाराज आहेत, असे ते म्हणालेत. मात्र, पवार कुटुंबात कोणताही कलह नाही. आम्ही सगळे एक आहोत. दिवाळीत आम्ही सर्व एकत्र येऊन दिवाळी साजरी करतो. अजित पवार यांच्याशी संपर्क झाल्यानंतर मी अधिक माहिती देईन, असे पवार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान,  अजित पवार आणि पार्थ हे दोघेही यापुढे राजकारणात सक्रीय नसतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.  तर अजित पवारांच्या जागेवर रोहीत पवार लढण्याची शक्यता अधिक वाढत आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे अजित पवारांनी आपला राजीनामा सोपवला आहे. परंतु अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा का दिला, याचे कारण अजून पुढे आलेले नाही. अजित पवार यांनी एका ओळीत राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी राजीनाम्याचा फॅक्स हा ५ वाजून ४० मिनिटांनी पाठवला. त्यांचा राजीनामा मंजूरही करण्यात आला आहे.

अजित पवार यांच्या राजीनाम्याची माहिती नाही : शरद पवार