लातूर : गेल्या काही दिवसांपासून हुंडाविरोधी अभियान मजबूत होत असून त्यात आणखी एक पाऊल पुढे पडलं आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूरचे नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांनी २० वर्षांपूर्वी लग्नात घेतलेला हुंडा आपल्या मेव्हण्याकडे जाहीरपणे परत केलाय. आणि तो ही दुपटीने.
हुंड्याचे असलेले ओझे कमी झाल्यामुळे नगराध्यक्ष महालिंगे हे आता हुंडाविरोधी अभियानात सक्रिय होणार आहेत.हुंडा न घेता आणि न देता लग्न करणाऱ्यांचे आता चाकूर नगरपंचायतीतर्फे गौरवही केला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथील शीतल वायाळ या विद्यार्थिनीने लग्नातील हुंड्याच्या भीतीमुळे आत्महत्या केली होती. तेंव्हापासून मिलिंद महालिंगे हे अस्वस्थ होते.
हुंडाविरोधी अभियानात सक्रिय व्हायची त्यांची इच्छा होती. पण स्वतःच्या लग्नात १९९७ मध्ये त्यांनी २५ हजार रुपये हुंडा घेतला होता. त्या हुंड्याचे ओझे त्यांच्या मनावर होते. त्यामुळे आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मिलिंद महालिंगेंनी मेव्हणे सुधाकर गायकवाड यांना हुंडा परत करण्याची इच्छा व्यक्त केली.
सुधाकर गायकवाडांनी नकार दिला. मात्र तरी महालिंगे यांनी आपल्या वाढदिवशी सर्वांपुढे ५० हजार रुपयाचा चेक लिहून गायकवाडांना दिला.