डी एस कुलकर्णी यांना सात दिवसांची पोलीस कोठडी

डीएस कुलकर्णी यांना पुणे विशेष न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 17, 2018, 08:30 PM IST
डी एस कुलकर्णी यांना सात दिवसांची पोलीस कोठडी  title=

पुणे : डी एस कुलकर्णी यांना पुणे विशेष न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. 

खुनापेक्षाही हा गुन्हा भयंकर आहे... कारण खुनात एकच व्यक्ती मरतो... पण, डीएसकेंनी केलेल्या फसवणुकीमुळे अनेक जण उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे, त्यांना १० दिवसांच्या पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायलयाकडे केली होती. परंतु, न्यायालयानं डीएसकेंना २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

डीएसकेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी योजनाबद्धरितीनं आर्थिक फसवणूक केलीय. त्यांच्या सात वेगवेगळ्या कंपन्या आहेत. जवळपास ११५३ कोटी ठेवी किंवा असुरक्षित कर्ज स्वरुपात स्वीकारले आहेत. त्यांनी हा पैसा कुठे वळवला? याचा तपास करायचा आहे. यात बँकांचाही पैसा आहे. याबाबतची कागदपत्रं आम्हाला मिळालेली नाहीत. बॅंकाचे व्यवहार तपासायचे आहेत... यात अनेक व्यक्ती सहभागी आहेत, त्याबाबतचा तपास करायचा आहे. डीएसकेंनी यापूर्वी त्यांनी तपासात सहकार्य केलेले नाही. यातील सर्व माहिती तेच सांगू शकतात कारण ते या गुन्ह्याचे मास्टरमाइंड आहेत. हा गुन्हा खुनाच्या गुन्ह्यापेक्षाही गंभीर आहे. कारण खुनात एकाचा मृत्यू होतो, इथे असंख्य लोक जिवंतपणी मरणयातना भोगत आहेत... त्याला जबाबदार फक्त डीएसके आहेत... त्यामुळे त्यांची पोलीस कोठडी हवी असल्याचा युक्तिवाद सरकारी वकीलांनी करत डीएसकेंच्या १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. 

डीएसकेंची विनंती 

तर दुसरीकडे, आमचा पोलीस कोठडीला विरोध नाही... चौकशीला सामोरं जायला तयार आहे. त्यानंतर मी गुंतवणूकदारांचे पैसे देणार आहेच. मी कुठे पळून जाणार नाही. माझा पासपोर्ट आधीच जमा केलाय. माझ्यावर असलेल्या देणीपेक्षा माझी मालमत्ता जास्त आहे, असं डीएसकेंनी कोर्टात म्हटलं. 

आरोपीच्या वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयानं डीएसकेंच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीचे आदेश दिलेत.  

 

पत्नीही पोलिसांच्या ताब्यात 

शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांची चार पथकं डीएसकेंना अटक करण्यासाठी रवाना झाली होती. शनिवारी पहाटे ३ वाजता दिल्लीतून डीएसके यांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी यांना पुण्यातील शिवाजी नगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. डीएसकेंचा मुलगा शिरिष आणि कुटुंबिय कोर्टात उपस्थित असून डीएसकेंना जे. टी. उत्पात कोर्टात हजर केलं गेलं. डीएसकेंसह त्यांच्या पत्नी हेमंती यांनाही ताब्यात घेण्यात आलंय.

डीएसकेंविरोधात आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे चार हजार तक्रारी अर्ज आले आहेत. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण २८४ कोटी २० लाख १६ हजार ५८० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलंय... तर पुणे पोलिसांकडे डीएसके यांनी कर्ज म्हणून वैयक्तिक घेतलेल्या रकमांसदर्भातही तक्रारी आल्या आहेत.