वाहतुकीची सोय नसल्याने महिलेचा २ किमी खाटेवरुन प्रवास

वाड्यावस्त्यांपर्यंत कधी होणार रस्ते?

Updated: Feb 22, 2020, 03:19 PM IST
वाहतुकीची सोय नसल्याने महिलेचा २ किमी खाटेवरुन प्रवास

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागातून आजही दळणवळणाची साधनं पोहोचलेली नाहीत. करवीर तालुक्यात भेंडाई धनगरवाडा इथे एका आजारी ज्येष्ठ नागरिक महिलेला चक्क २ किलोमीटर खाटेवरून घेऊन जाण्याची वेळ आली. 

करवीरच्या पश्चिम भागातील सांगरुळ परिसरातील भेंडाई धनगरवाडा येथील धाकलुबाई बजु देवणे या वृद्ध महिलेला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्याची गरज होती. पण वाहतुकीची सोय नसल्याने नातेवाईकांना पायवाटेने डोंगर उतरून खाटेवरून खाली पायथ्याशी असलेल्या पाचाकटेवाडी येथे आणून मग एसटीने कोल्हापूरला नेण्याची वेळ आली. 

आजही या वाडीवस्तीवरील लोकांना रस्तेअभावी किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा २ किलोमीटर पायपीट करत अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.