दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणतात...

परीक्षांवरची कोरोनाची टांगती तलवार कायम 

Updated: Mar 4, 2021, 08:00 PM IST
दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणतात...

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदाही ऑफलाईन पद्धतीनंच होतील, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र या परीक्षांवरची कोरोनाची टांगती तलवार कायम आहे. तर दुसरीकडं गोंधळामुळं पुणे विद्यापीठाच्या परीक्षाही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

परीक्षेवर कोरोनाचं संकट

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे या कालावधीत होणार आहे. दरवर्षीप्रमाणं यंदाही लेखी पद्धतीनंच ही परीक्षा होईल, असं शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या दृष्टीनं आवश्यक काळजी घेऊन परीक्षा होईल, असं त्यांनी सांगितलं.

विद्यापीठांच्या परीक्षाही लांबणीवर?

दुसरीकडं विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्यातील विद्यापीठांच्या प्रथम सत्र परीक्षा 15 मार्च पासून घेण्याच्या सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र निविदा प्रक्रिया रखडल्यानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा सुरू व्हायला एप्रिल उजाडेल, अशी स्थिती आहे. त्यात दुसऱ्या सत्राची परीक्षा कधी होणार, हे देखील प्रश्नचिन्हच आहे.

दहावी, बारावी तसंच विद्यापीठ परीक्षा वेळेवर व्हाव्यात, असा राज्य सरकारचा खटाटोप आहे. मात्र कोरोना आणखी काय विघ्न आणतो, त्यावर विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आहे.