थंडीचा कडाका वाढताच अंडी महागली; 1 डझन अंड्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे

Egg Price Hike: थंडीची चाहूल लागताच अंड्याची किंमतीत वाढ झाली आहे. आता एक डझन अंड्याची किंमत शंभर रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 18, 2023, 10:15 AM IST
थंडीचा कडाका वाढताच अंडी महागली; 1 डझन अंड्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे title=
Egg prices touch Rs 90 dozen in Mumbai maharashtra

Egg Price Hike: राज्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. काही भागात तापामानात घसरण झाली असून गार वारे वाहू लागले आहेत. थंडीची चाहूल लागताच मात्र, अंड्याच्या दरात वाढ  झाली आहे. अंड्यांच्या किंमतीत प्रतिनग दोन रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. थंडीचा कडाका वाढल्याने अंड्याच्या दरात तेजी आल्याचे पाहायला मिळाले आहे. अंडी ही उष्ण असतात त्यामुळं शरीराला उष्णता मिळावी यासाठी अंड्यांचे सेवन केले जाते. त्यामुळं थंडीच्या हंगामात सर्रास अंड्यांच्या किंमतीत वाढ होते. त्यामुळं सर्वसामान्यांचा प्रोटीनयुक्त आहार महागण्याची चिन्हे आहेत.

किरकोळ बाजारात अंड्याच्या दरात वाढ झाली आहे. पाच रुपये नग याप्रमाणे मिळणाऱ्या अंड्याचे दर आता सात रुपयांवर गेले आहेत. त्यामुळं प्रतिडझन 84 रुपयांनी अंड्याची विक्री होत आहे. काहि दिवसांत दर आणखी वाढून शंभरी गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी होलसेल बाजारात १६० रुपयांना ३० अंड्यांचा ट्रे मिळत होता. मात्र, 30 अंड्यांच्या ट्रेसाठी 180 रुपये मोजावे लागत आहे. मात्र, आता उत्पादन घटल्याने डझनाचा दर शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अंडी नव्वद ते शंभर रुपये डझनने विकली जाण्याची शक्यता विक्रेत्यांनी बोलून दाखवली आहे. 

अंड्यांचे उत्पादन घटल्याने दर वाढल्याची माहिती समोर येत आहे. उत्पादन घटले आहे आणि मागणीप्रमाणे अंडी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं डिसेंबर महिन्यात एक डझन अंड्याचा दर 96 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. करोनानंतर अंड्यांच्या मागणीतही वाढ झाली असून हिवाळ्यात सातत्याने दर वाढत आहेत. 

कोंबडीचे खाद्य महागल्यानेही अंड्याच्या दरात करण्यात आली आहे. अंडी महागल्याचे हे एक प्रमुख कारण आहे. यंदा ऑगस्ट महिना पावसाअभावी गेला. तसंच, राज्यात पुरेसा पाऊसही झाला नाही त्यामुळं सोयाबीन, मका या पिकांच्या उत्पादनाला फटका बसला आणि उत्पादन कमी झाले. त्यामुळं कोंबडीचे खाद्य महागले. त्यामुळं अंड्याच्या दरवाढीत भर पडत आहे, अशी प्रतिक्रिया विक्रेत्यांनी दिली आहे.

अंड्याच्या दरात वाढ झाल्याने आता हिवाळ्यात अंडी खाण्यावर निर्बंध येणार आहेत. थंडीमध्ये अंडी खाण्याचं प्रमाण वाढतं कारण अंडी ही उष्ण असतात. कडाक्याच्या थंडीत अंडी खाल्ल्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं. पण ऐन थंडीत अंडी महागली आहेत.