बलात्काऱ्यांना २१ दिवसांत शिक्षा देण्यासाठी कायदा आणणार - एकनाथ शिंदे

आंध्रप्रदेशच्या धर्तीवर २१ दिवसांत बलात्काऱ्यांना फाशी देण्यासंदर्भातला कायदा लवकरच महाराष्ट्रातही

Updated: Dec 18, 2019, 06:39 PM IST
बलात्काऱ्यांना २१ दिवसांत शिक्षा देण्यासाठी कायदा आणणार - एकनाथ शिंदे

मुंबई : आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्यात बलात्काऱ्यांना २१ दिवसांत फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात फाशी देण्याचा कायदा करणार असल्याचा निर्धार गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. बलात्काऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी तरतूद असावी अशी मागणी होत आहे. जनभावनेचा विचार करून बलात्काऱ्यांना २१ दिवसांत फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करणार असल्याचं गृहमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.

आरोपीच्या दोषींना २१ दिवसांत फाशीची शिक्षा व्हावी, अशी तरतूद करणारा कायदा करावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये केली होती. 

२१ दिवसांत शिक्षा शक्य?

हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आंध्र प्रदेश सरकारनं 'एपी दिशा अधिनियम' नावाच्या विधेयकाला मंजुरी दिलीय. या विधेयकानुसार, बलात्कार प्रकरणातील दोषींना मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलीय. इतकंच नाही तर दोषींना २१ दिवसांत शिक्षा होईल, अशीही तरतूद या विधेयकात करण्यात आलीय. आंध्र प्रदेश सरकारच्या कॅबिनेटने बैठक घेत हा निर्णय गेला. कॅबिनेटने या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आता हे विधेयक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलं जाणार आहे. हे विधेयक मंजूर झालं तर सात दिवसांच्या आत पोलिसांनी चौकशी पूर्ण करुन १४ दिवसांच्या आत सुनावणी पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर २१ दिवसांच्या आत आरोपीला शिक्षा दिला जाणार आहे.