ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील हत्तीवरील सफारी अचानक बंद

 ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सुरु करण्यात आलेली हत्तीवरील सफारी अचानक बंद करण्यात आली आहे. 

Updated: Nov 28, 2017, 10:23 PM IST
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील हत्तीवरील सफारी अचानक बंद  title=

आशिष अम्बाडे, चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सुरु करण्यात आलेली हत्तीवरील सफारी अचानक बंद करण्यात आली आहे. 

 अत्यल्प प्रतिसाद 

हत्तींवर हिवाळ्यात करण्यात येणा-या "चोपिंग" या विशेष ट्रीटमेंटसाठी ही सफारी बंद करण्यात आल्याचे अधिकारी सांगत असले तरी या सफारीला पर्यटकांचा मिळणारा अत्यल्प प्रतिसाद पाहता ही सफारी बंद करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

 १५ दिवसांतच सफारी बंद 

ताडोबा व्याघ्र प्रकल्प म्हणजे पर्यटकांची वर्षभर गर्दी असलेलं पर्यटनस्थळ. यंदाच्या वर्षी १३ नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी दररोज हत्तीवरून ताडोबा दाखविण्याची नवीन योजना सुरू करण्यात आली. त्यासाठी दोन हत्ती देखील तैनात करण्यात आले. मात्र अचानक १५ दिवसांतच ही सफारी बंद करण्यात आली. 

चोपिंग या हत्तींच्या पायावरील भेगांच्या उपचारासाठी ही सफारी बंद करण्यात आल्याचं अधिका-यांकडून सांगण्यात आलंय. मात्र चोपिंग जर हिवाळ्यात दरवर्षी केल्या जात असले तर मग या उपचारांआधी हत्ती सफारी सुरू करण्याची काय गरज होती असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. 

हत्ती सफारीला विशेष प्रतिसाद नाही!

१३नोव्हेंबरला ही सफारी सुरू झाली आणि आत्तापर्यंत केवळ 4 वेळी हत्तीची सफारी झालीय. त्यात १५  दिवसांत अवघ्या ११पर्यटकांनी हत्तीवरून ताडोबाची सफर केलीय. त्यामुळेच अधिकारी देखील हत्ती सफारीला विशेष प्रतिसाद मिळत नसल्यानं पर्यटकांची विेशेष अडचण होणार नाही हे मान्य करतायत. 

हत्तीच्या सफारीसाठी प्रति व्यक्ती एक हजार रुपये आणि मुलांसाठी पाचशे रुपये शुल्क ठेवण्यात आलं होतं. ताडोबा पर्यटनाच्या इतर सफरींपेक्षा हे शुल्क जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे देखील या हत्तीसफारीला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. मात्र परिस्थितीचा अभ्यास आणि विचार न करता अधिकाऱ्यांनी दाखवलेला उत्साह सध्या तरी शून्यावर पोहोचलाय.