Elon Musk : विदर्भात दिसली एलन मस्क यांच्या 55 सॅटॅलाईटची स्कायलिंक ट्रेन, मराठवाड्यातही आकाशात चमकला विजेचा गोळा

आकाशात चमकणारी वस्तू पाहून नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. 

Updated: Feb 2, 2023, 11:51 PM IST
Elon Musk : विदर्भात दिसली एलन मस्क यांच्या 55 सॅटॅलाईटची स्कायलिंक ट्रेन, मराठवाड्यातही आकाशात चमकला विजेचा गोळा

Elon Musk Starlink Satellites train in the sky : महाराष्ट्रात आश्चर्यकारक घटना पहायला मिळाल्या आहेत. विदर्भातील चंद्रपूरच्या (Chandrapur) आकाशात नागरिकांनी अनुभवली एलन मस्क यांच्या 55 सॅटॅलाईटची स्कायलिंक ट्रेन (Elon Musk Starlink Satellites train in the sky). संध्याकाळी आकाशात ही ट्रेन दिसू लागल्याने खगोल अभ्यासकांमध्ये कुतुहल निर्माण झाले.  मराठवाड्यातही आकाशात विजेचा गोळा चमकल्याचा अनुभव नागिकांना आला. 

चंद्रपुरात गुरुवारी संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आकाशात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी ठिपक्यांची एक प्रकाशमान रेषा दिसू लागली. याआधी चंद्रपूरच्या आकाशात सॅटेलाईटचा तुकडा व धूमकेतू दिसल्याने नागरिकांमध्ये याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, ही प्रकाशाची रेष दुसरे तिसरे काही नसून एलन मस्क यांची स्कायलिंक ट्रेन असल्याचे पुढे आले आहे. 

भक्कम इंटरनेट जोडणी साठी अवकाशात अशा प्रकारच्या 55 सॅटेलाईट ची एक ट्रेन सोडण्यात आली असून तीच चंद्रपूरच्या आकाशात दिसल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. आकाशात अशा प्रकारे ही स्कायट्रेन भविष्यात अनेकदा दिसू शकते असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

बुलढाण्यातील मलकापूर मध्ये आकाशात चमकला विजेचा गोळा 

गुरुवारी संध्याकाळी 7.10 मिनिटांनी मलकापूर तालुक्यासह, जळगाव जामोदच्या दिशेने आकाशातून विमान किंवा रॉकेट वस्तू दिसली. मागे आग लागलेली तसेच त्यामागे 40 ते 50 फूट आग आणि धूर दिसत होता. अनेकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ काढलाय मात्र आता जिल्ह्यात तर्कवितर्क सुरू आहेत. तर काही जण हे उल्कापिंड असल्याचा दावा करत आहेत. मात्र याबद्दल अधिकृत काहीच समजू शकले नाही. मात्र अशीच घटना मागील वर्षी देखील घडली होती. या घटनेत जे दिसल ते कृत्रिम उपग्रहाचे पार्ट असल्याचं निदर्शनास आल होते.