चिमुरडीने घेतलं शहीद वडिलांचं अंत्यदर्शन आणि उपस्थितांचे डोळे पाणावले

चिमुरडीने घेतलं शहीद वडिलांचं अंत्यदर्शन आणि उपस्थितांचे डोळे पाणावले

Updated: Mar 1, 2019, 02:15 PM IST
चिमुरडीने घेतलं शहीद वडिलांचं अंत्यदर्शन आणि उपस्थितांचे डोळे पाणावले title=

नाशिक : निनाद मांडवगणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबियांनी आणि नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र या गर्दीतही साऱ्यांच्या नजरा खिळावल्या होत्या त्या निनाद यांच्या दोन वर्षांच्या मुलीवर. आपण आपला मुलगा गमावला यापेक्षाही आपल्या देशासाठी आपला मुलगा शहीद झाला या विचाराने अभिमानाने वावरणाऱ्या या आई-वडील आणि वीरपत्नीला खरंच सलाम... निनादच्या या अंत्यदर्शनावेळी सगळेच नाशिकमध्ये होते असं नाही. मात्र या ज्यांनी या अंत्यदर्शनावेळी निनादच्या मुलीला पाहिलं त्यांच्या काळजाचा ठोका दोन सेकंद का होईना चुकला असेलच. निनाद यांच्या भावाने या छोट्याश्या चिमुकलीला तिच्या बाबांचं अखेरचं दर्शन घेता यावं या उद्देशाने जेव्हा स्टेजवर आणलं. तेव्हा ते पाहणाऱ्या प्रत्येकाचं मन हेलावून गेलं. 

हे काय चाललंय. एवढी सगळी मंडळी का जमली आहेत. वर्षातून एकदा किंवा दोनदा भेटणाऱ्या आणि एरव्ही फोटोतूनच पाहणाऱ्या बाबांचा हा फोटो इथे का लावलाय असे अनेक प्रश्न या चिमुकलीच्या मनात गोंधळ घालत असतीलही कदाचित. मात्र बाबांच्या या शौर्याचा एक वेगळाच अभिमान ह्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर जणू दिसत होता. निनादचे आई, बाबा, त्यांची पत्नी सगळेच मोठ्या धैर्याने या प्रसंगाला सामोरे जात आहेत. मात्र आता वर्षातून एकदा-दोनदा भेटणारे बाबा कायमचे आपल्याला सोडून गेले म्हणून बाबांच्या पार्थिवावर लावण्यात आलेल्या फोटोला शेवटचा पापा देणाऱ्या मुलीला पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले. इतकंच नाही तर जणू बाबा हेलिकॉप्टरने परत येतीलंही असंही कुठेतरी ह्या चिमुकलीचं वेडं मन मानत असेल म्हणून एवढ्या गर्दीतही तिचं लक्ष जणू आकाशीच होतं.