पहिल्यांदाच वाघाला कृत्रीम पंजा बसवण्याचा प्रयोग

साहेबराव पुन्हा ऐटित चालणार ?    

Updated: Jan 18, 2020, 08:01 AM IST
पहिल्यांदाच वाघाला कृत्रीम पंजा बसवण्याचा प्रयोग

नागपूर : वाघाला कृत्रीम पंजा बसवण्याचा देशातला पहिलाच प्रयोग आज नागपुरात होणार आहे. गोरेवाडा बचाव केंद्रातील साहेबराव वाघाला आज कृत्रीम पंजा बसवण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय डॉकटरांचं पथक,भारतातील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सुश्रूत बाभूळकर आणि काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू यासाठी अनेक महिन्यांपासून आवश्यक त्या सर्व तपासणी आणि उपचार करत आहे. 

२०१२ मध्ये बहेलिया शिका-यांनी पळसगाव येथे लावलेल्या सापळ्यात साहेबराव अडकला. यावेळी त्याच्यासोबत असलेला दुसरा वाघ शिका-याच्या सापळ्यात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला होता. साहेबराव वाघ वनविभागाच्या टीमने केलेल्या प्रयत्नांमुळे वाचला.. 

मात्र सापळ्यात पाय अडकल्याने त्याची दोन बोटे निकामी झाली. त्यामुळे एका पायाने जखमी असलेल्या साहेबरावला गेल्या आठ वर्षांपासून तीन पायावरच चालावं लागतंय. त्याची हीच वेदना देशातील आघाडीचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. बाभुळकर यांनी ओळखली.

बाभूळकर यांनी साहेबराव वाघाला दत्तक घेताना त्याला नीट चालता यावे म्हणून कृत्रिम पंजा बसविण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी त्याच्यावर कृत्रिम पंजा बसवण्याच्या दृष्टीनं पायाचे मोजमाप घेण्यात आलं.

त्यानंतर आवश्यक उपचार करताना त्याच्या मज्जातंतूशी संबंधित वेदना क्षमवण्यासाठी न्यूरोमा आणि संधीवातातून आराम मिळविण्यासाठी दुसरी शस्त्रक्रिया गोरेवाडा रेस्क्यू सेंटर येथे नुकतीच करण्यात आली होती.त्यानंतर आता त्याला कृत्रिम पाय बसविण्यासाठी आज प्रयत्न करण्यात येणार आहे.