पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना 'अजित पवार' का नकोसे झालेत?

पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अजित पवार का नकोत?

Updated: Jan 17, 2020, 09:21 PM IST
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना 'अजित पवार' का नकोसे झालेत?

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : ज्या पिंपरी-चिंचवड मध्ये अजित पवार यांचे बारामती नंतर सर्वाधिक फॅन आहेत. पण त्याच पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना अजित पवार नको आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण हे खरे आहे. पिंपरी चिंचवड हा अजित पवार यांचा कधीकाळचा बालेकिल्ला. आता तो खालसा झाला असला तरी बारामतीनंतर आज ही पिंपरी चिंचवड अजित पवार यांचे मोठे फॅन आहेत. पण याच पिंपरी-चिंचवड मध्ये त्यांच्याच नगरसेवकांनी अजित पवार शहरात नको असं म्हटलं आहे. तुम्हाला धक्का बसला असेल तरी ही हेच खरे आहे. पण तुम्हाला जे अजित पवार वाटतात ते नाही. 

पण आम्ही ज्या अजित पवारांबाबत बोलतोय ते अजित पवार पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत. हेच ते अजित पवार. काही दिवसांपूर्वी त्यांनी वाकड इथं कसलीही सूचना न देता अतिक्रमण कारवाई केली. त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टचाराचे आरोप झाले. इतर ही काही मुद्द्यांवर त्यांच्यावर आरोप झाले. मग काय पिंपरी चिंचवड मधल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या अजित पवारांचा त्या अजित पवारांशी संबंध नाही असा खुलासा केला तर काहींनी थेट त्यांच्या बदलीची मागणी केली.

दुसरीकडे या बाबतीत अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. एकूणच काय तर नाम साधर्मामुळे पिंपरी-चिंचवड मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसला सहाय्यक आयुक्त अजित पवार नको वाटू लागले आहेत.