महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण; जिथे मिळते देवीच्या साडेतीन शक्तीपिठांचे एकत्र दर्शन, अख्यायिका जाणून घ्या

Ahmednagar Devi Temple: नवरात्रीच्या दिवसांत देवीचा जागर केला जातो. महाराष्ट्रातही एक स्थान असं आहे जिथे देवीच्या साडेतीन शक्तीपिठांचे एकत्र दर्शन मिळते.

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 8, 2024, 10:46 AM IST
महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण; जिथे मिळते देवीच्या साडेतीन शक्तीपिठांचे एकत्र दर्शन, अख्यायिका जाणून घ्या title=
famous temple of maharashtra where Three and a half Shakti Peethas and unite

Ahmednagar Devi Temple: देशात व राज्यात सध्यात नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. ठिकठिकाणी देवीचा जागर केला जात आहे. महाराष्ट्रात साडे तीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. साडेतीन शक्तिपीठांचे राज्यात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र महाराष्ट्रात असं एक स्थान आहे जिथे देवीच्या साडेतीन शक्तीपिठांचे एकत्र दर्शन मिळते. कुठे आहे हे स्थान आणि काय आहे यामागची आख्यायिका जाणून घेऊया. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार गावात भगवती देवीचे मंदिर आहे. तुळजाभवानी, रेणूकामाता, भगवती आणी वणीची सप्तश्रृंगी अशा साडेतीन शक्तीपीठांचे एकत्र वास्तव्य असलेलं पुरातन मंदिर आहे. भक्ताच्या इच्छेखातर देवींनी दर्शन दिले आणी तेव्हापासून या गावात साडेतीन शक्तीपिठं एकत्र असल्याची या मंदिराची आख्यायिका आहे. हे एक जागृत देवस्थान आहे. नवरात्रात या मंदिरात देवीची मोठी यात्रा भरते तसंच, भक्तांची ही मोठी गर्दी होते. 

नगर-मनमाड रस्त्यावरील प्रवरा नदीच्या तीरावर हे मंदिर वसले आहे. या मंदिरात तुळजापूरची तुळजाभवानी, माहुरची रेणुका माता, वणीची सप्तश्रृंगी माता आणि कोल्हार भगवतीपूरची भगवती माता असे साडीतीन शक्तीपीठांचे एकत्रीत मंदिर आहे. मोठ्या संख्येने भाविक येथे येत असतात. या मंदिराला जवळपास 250 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. मंदिरात व्याघ्रशिल्पे असून 13 व्या शतकातील ही शिल्पे आहेत. 

मंदिराची अख्यायिका काय आहे?

असं म्हणतात की, समुद्र मंथनामधून अमृत निघाल्यानंतर अहमदनगर येथील नेवासा येथे दानव राहु हा देवांमध्ये मिसळला. नोगिनी रुपताली विष्णुंनी त्याचे कपट ओळखून त्याचा शिरच्छेद केला. त्यानंतर प्रवरा परिसरात मोठा कोलाहल माजला. देव आणि दानव यांच्यात युद्ध झाले. हा कोलाहल शमवण्यासाठी शंकराने स्वतः प्रकट होऊन श्री भगवतीची स्थापना केली. देवीने संपूर्ण राक्षसांचा नायनाट केला. त्यानंतर देवीची विचारपूस करण्यासाठी भगवतीमातेच्या भवानी माता, रेणुकामाता,सप्तश्रृंगीमाता या भगिनी येथे आल्या. अशी आख्यायिका आहे. 

प्रभू श्रीरामानेही या ठिकाणी भेट दिल्याची आख्यायिका आहे. श्रीराम 14 वर्षांचा वनवास भोगत असताना प्रवरानदीच्या काठी मुक्कामी होते. तेव्हा त्यांनी नदीत वाळुची महादेवाची पिंड तयार केली. त्यांनी तिथे कोल्हाळेश्वराची स्थापना केली. कोल्हाळेश्वरामुळं या गावाला कोल्हार असं नाव पडलं, असंही काही जण सांगतात. तसंच, भगवतीमातेच्या मंदिरामुळं या परिसराला भगवतीपूर हे नाव पडले आहे.