धुळे : सरकारनं आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही सर्व कुटुंब सामूहिक आत्महत्या करू असा इशारा मंत्रालयात आत्म्हत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई पाटील यांनी दिला आहे.
न्याय मिळवून देण्याची सरकारची भूमिका दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. महिला दिननिमित्तानं सखुबाई पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत योग्य मोबदला देण्याची मागणी केली. योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत धर्मा पाटील यांच्या अस्थींचं विसर्जन करणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यानिमित्तानं केला.
मंत्रालयात आत्महत्या करणारे ८५ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना जमिनीच्या मोबदल्यापोटी ९ पट रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचे ५४.४८ लाख रुपये मिळणार होते. पण अजूनही हा मोबदला त्यांच्या कुटुंबियांना मिळालेला नाही.
याआधी त्यांच्या पाच एकर बागायती जमीनीसाठी फक्त ६ लाख रुपये देण्यात आले होते. पण धर्मा पाटील यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर धुळ्यातील विखरणमध्ये होऊ घातलेल्या वीज निर्मिती प्रकल्पासाठी संपादित १९९ एकर जमिनीचं पुनर्मूल्यांकन करण्यात आलं. यानुसार आता धर्मा पाटील आणि त्यांच्यासोबत आणखी १२ शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला मंजूर करण्यात आला आहे.