विदर्भ : राज्यातील विजयी उमेदवार दिवाळी साजरी करीत असताना आणि सर्वच राजकीय पक्ष सत्तास्थापनेचे गणित जुळवित असताना शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र परतीच्या पावसानं पार कोलमडलंय. विदर्भात ऐन दिवाळीत पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावत त्यांचं दिवाळं काढलं आहे. अशावेळी प्रशासन मात्र मदतीच्या नावानं केवळ कागदी घोडे नाचवित आहे. वर्षभर शेतात कष्ट उपसल्या नंतर शेतकऱ्यांच्या हाती शेतमाल यायच्या वेळी परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे.
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन, कापूस आणि ज्वारीचं प्रचंड नुकसान झालं आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे पऱ्हाटी आडवी झाली, कापसाचे बोंड भिजून गळून पडले, सोयाबीन पाण्यात गेले, तर ज्वारी काळी पडली. मका भिजल्यानं अंकुरला असून तूर पाण्याने सडली आहे. भात पिकाचे देखील नुकसान झाले आहे.
कर्जमाफी नाही त्यात नव्याने कर्ज देखील नाही त्यामुळं सावकाराचे उंबरठे झिजवून उधार उसनवारीवर शेतकऱ्यांनी लागवड खर्च केला. शेतमाल विक्री करून उधारी फेडायची होती मात्र पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडंच मोडलं, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात घालविली. लोकप्रतिनिधी मात्र राजकीय घडामोडीत व्यस्त आहेत. तर प्रशासकीय यंत्रणा देखील जागेवरूनच कागदी घोडे नाचवित असल्यानं शेतकऱ्यांची मदतीच्या नावानं पुन्हा फसवणूक तर होणार नाही अशी शंका आहे.
कृषी विभागाच्या पीक नुकसानीच्या प्रार्थमिक नजरअंदाज अहवालात अमरावती विभागात १० लाख ५२ हजार २२ शेतकऱ्यांचे ११ लाख ९६ हजार ५२ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यात असून त्याखालोखाल अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ मध्ये पिकांना पावसाचा जबर तडाखा बसला आहे. कर्जमाफी, बोंडअळी आणि दुष्काळी मदतीत ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना शासकीय विभागाचे उंबरठे झिजवावे लागले.
त्याच प्रमाण आता पीक नुकसान सिद्ध करण्यासाठी कागदोपत्री सोपस्कार करण्याचेही त्राण शेतकऱ्यांमध्ये शिल्लक नाही. सतत अस्मानी सुलतानी संकटांमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ट संपता संपत नसल्याचे विदारक वास्तव आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना ताबडतोब मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे.
पिके काढणीला आली असतानाच परतीच्या पावसाने जोरदार तडाखा देत शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. अशावेळी अन्नदात्या शेतकऱ्याला जगविण्यासाठी सत्तासंघर्ष सोडून शेतकरी हीत जोपासण्याची हीच वेळ आहे.