ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर लक्ष, किटकनाशक फवारणी करण्याचा प्रयोग

राज्यात विदर्भातील अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये टोळधाडीने आक्रमण केले आहे.  

Updated: May 30, 2020, 06:29 AM IST
ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर लक्ष, किटकनाशक फवारणी करण्याचा प्रयोग title=

मुंबई : राज्यात विदर्भातील अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये टोळधाडीने आक्रमण केले आहे. आधीच कोरोनाचा फैलाव आणि त्यात आता टोळ धाड, यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आता कृषि विभागामार्फत किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. ड्रोनच्याही माध्यमातून या टोळधाडीवर लक्ष ठेवण्यात येणार असून किटकनाशकांची फवारणी करण्याबाबत प्रयोग करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नसल्याचे कृषीमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 २४ मेच्या सुमारास मध्यप्रदेश मार्गे अरावतीच्या काही भागात टोळ धाड आली आहे. अग्निशमन दलाच्या बंबांच्या माध्यमातून तसेच कीटकनाशक फवारणी यंत्राच्या सहाय्याने त्यांच्यावर फवारणी करुन ५० टक्क्यांपेक्षा जास्त टोळ किटकांचा नायनाट झाल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले आहे. या किटकांवर फवारणी करण्यासाठी लागणारे कीटकनाशक प्रादुर्भाव असलेल्या भागातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मोफत पुरविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पालघर येथे शेतकऱ्यांना इशारा 

मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नाही. काल यासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्या भागाचा उल्लेख होता, तेथे ठाणे विभागाचे कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तेथे टोळधाडीचे आक्रमण झाले नसल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र गुजरातकडील भागातून या किटकांचे आक्रमण होऊ शकते ही शक्यता गृहीत धरुन पालघर आणि गुजरात सीमेलगतच्या भागातील शेतकरी बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याचे सह संचालक पाटील यांनी सांगितले.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, मोर्शी, वरूड या तालुक्यातील काही भागात टोळधाड येऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. टोळधाडीपासून शेतीपिकाचे नुकसान टाळण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना दिवसा प्रामुख्याने पत्र्याचे डबे वाजविणे, ट्रॅक्टर, मोटर सायकलचे सायलेन्सर काढून मोठा आवाज करुन या किटकांना हुसकावून लावणे आदी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. तसेच सायंकाळी ज्या क्षेत्रात किटक झाडावर विसावले असतील, त्याबाबत कृषी विभागाला माहिती देऊन त्या किडीवर किटकनाशकांची फवारणी करणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत.