Farmers Protest: शेतकर्‍यांवर कोणताही अन्याय होणार नाही - नितीन गडकरी

शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. आमचे सरकार शेतकऱ्यांविषयी निष्ठा ठेऊन आहे, असेही गडकरी म्हणाले. 

Updated: Dec 15, 2020, 03:47 PM IST
Farmers Protest: शेतकर्‍यांवर कोणताही अन्याय होणार नाही - नितीन गडकरी title=

नागपूर : शेतकऱ्यांवर ( Farmers Protest) कोणताही अन्याय होणार नाही. आमचे सरकार शेतकऱ्यांविषयी निष्ठा ठेऊन आहे. शेतकऱ्यांच्या सर्व सूचना स्वीकारल्या जातील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्पष्ट केले आहे. काही घटकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, असेही गडकरी म्हणाले. 

शेतकऱ्यांनी तिन्ही कायदे (New Farm Law ) समजून घ्यावे, असे गडकरी म्हणाले. शेतमाल बाजारपेठेत अथवा कुठेही विकणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे, असेही गडकरी म्हणाले. तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी गडकरींच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली.

दरम्यान, याआधी आमचे सरकार शेतकऱ्यांना कृषी कायदे योग्य आहेत हे पटवून देईल, समजावून सांगेल आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या घडीला कृषी आणि वाणिज्य मंत्री शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. जर मला चर्चा करण्यासाठी सांगितलं तर मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधेन, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सोमवारी दिल्लीच्या आसपासच्या भागात हजारो लोकांना त्रास सहन करावा लागला.  शेतकरीही दिल्ली गाझीपूर सीमेवर उपोषणाला बसले होते. त्यांच्या समर्थनार्थ शेतकरीही दिल्ली-मेरठ महामार्गावर धरणे आंदोलन सुरु केले. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, शेतक्यांनी देशभरातील जिल्हा मुख्यालयात धरणे आंदोलन करून नवीन 
कृषी कायद्यांना विरोध दर्शविला.

शेतकरी आंदोलन बरिसोपाचा पाठिंबा

तर दुसरीकडे केंद्राचे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टीने पाठिंबा दिला आहे. आज धुळे जिल्हा कृषी बाजार उत्पन्न समितीच्या आवारात फटाके फोडून निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने शेतकर्‍यांचे आणि ग्राहकांची लूट करण्याच्या हेतूने कॉर्पोरेट कंपन्यांचा फायदा करून देणारे तीन जनविरोधी तसेच देशातील शेतकरी विरोधी कृषी कायदे संसदेत भाजप सरकारने पारित केल्याचा आरोप करण्यात आला. हे कायदे त्वरीत रद्द करण्याची मागणी  बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टीच्यावतीने यावेळी करण्यात आली.