नाशिक : शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत निफाडमधील शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांचा निषेध केलाय.
मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याचं जाहीर करण्यात आल्यानंतर किसान क्रांती सेनेचा आनंदोत्सव साजरा केला... पण हा निर्णय इतर अनेक शेतकरी संघटनांनी मात्र धुडकावून लावलाय. या बैठकीला कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत हेदेखील उपस्थित होते.
या निर्णयाचा निषेध म्हणून निफाड तालुक्यातील रुई इथं राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याची प्रेतयात्रा काढली गेली... आणि या पुतळ्याचं दहनही करत शेतकरी संघटनेनं निषेध व्यक्त केलाय. इतकंच नाही तर सदाभाऊंनी आपल्या छातीवरचा शेतकरी संघटनेचा बिल्ला काढून टाकावा, असं म्हणत आपला संतापही त्यांनी व्यक्त केलाय.
राज्यमंत्री सदाभाऊ खोत सरकारशी हात मिळवणी करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियातही व्यक्त होतेय. फेसबुक आणि व्हॉटसअपवर सदाभाऊ खोत हरवले असल्याचंही म्हटलं जातंय.
निफाड तालुक्यातील नैताळे इथं शेतकरी संपाच्या तिसऱ्या दिवशी संपकरी शेतकरी आक्रमक झालेले दिसले. धक्कादायक म्हणजे, बटाटे घेऊन चाललेला ट्रक रस्त्यावर अडवून ट्रकमधील बटाट्याच्या गोण्या रस्त्यावर ओतून दिल्या गेल्या. रस्त्यावर टायर जाळीत शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. गेल्या तीन दिवसांपासून नैताळे गाव संपूर्णपणे बंद असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा इथल्या शेतकऱ्यांनी दिलाय.