औरंगाबाद : 1 मार्च 2018 पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार अशी घोषणा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी औरंगाबादेत केली आहे.
या वेळी शेतकरी पूर्णपणे असहकार आंदोलन पुकारण्यात येईल, कुठलाही शेतीमाल शहरात येणार नाही, आणि आता माघार नाही, अशी घोषणा सुकाणू समितीच्या बैठकीत रघुनाथदादा पाटलांनी केली आहे. आतापर्यंत अनेकदा बोलूनही शेतकऱ्यांच्या मागणीवर सरकारनं कुठलेही ठोस उपाय केले नाहीत. 1.50 लाखांची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोपही रघुनात पाटील यांनी केला आहे. सुकाणू समितीच्या बैठकीनंतर शेतकरी नेते रघुनाथ पाटलांनी दिला इशारा आहे.
बोंडबळीचा प्रश्न, कापसाचा भाव, उसाचा भाव या सर्वच बाबत सरकार गंभीर नाही, त्यामुळं पुन्हा आंदोलनाचे हत्यार शेतकरी उपसणार असल्याचं रघुनाथदादा पाटील म्हणाले.16 किंवा 17 जानेवारीला सुकाणू समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि मागण्यांबाबत चर्चा करणार आहे. सरकारनं प्रतिसाद दिला नाही तर संप अटळ असल्याचंही ते म्हणालेत.