चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघात गुरू-शिष्यामध्ये लढत

कोण मारणार बाजी ?

Updated: Oct 16, 2019, 11:00 PM IST
चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघात गुरू-शिष्यामध्ये लढत  title=

चंद्रपूर : राजुरा मतदारसंघात गुरू-शिष्यांमध्ये लढत बघायला मिळते आहे. जेष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप आणि त्यांचे शिष्य संजय धोटे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. राजुऱ्यात शेतकरी संघटनेची चांगली पकड आहे. चटप इथून ३ वेळा विधानसभेवर गेले आहेत. आता ते स्वतंत्र भारत पक्षाकडून निवडणूक लढत आहेत. तर चळवळीतले त्यांचे शिष्य धोटे भाजपकडून रिंगणात उतरले आहेत. 

धोटेंना संधी दिल्यामुळे चटप नाराज होते. या लढतीमुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. गुरूशिष्यांची ही लढाई आपल्या पथ्यावर पडेल या अपेक्षेने काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे जोरदार प्रचार करत आहेत.

राजुरा विधानसभा मतदारसंघ तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून आहे त्यामुळे येथे कुणबी, आदिवासी, तेलुगू आणि मुस्लीम मतदारांची संख्या निर्णायक ठरणार आहे. गोंडपिपरी, कोरपना, जिवती आणि राजुरा असे चार तालुके मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. प्रत्येक भागाचे प्रश्न आणि समस्या हे वेगवेगळे आहेत. 

शेतकरी संघटना आणि काँग्रेसचा गड असलेला राजुरा मतदारसंघात 2014 मध्ये भाजपच्या संजय धोटे यांनी विजय मिळवला होता. काँग्रेसचे उमदेवार सुभाष धोटे यांचा तीन हजार मतांनी पराभव झाला होता. पण 2014 मध्ये वामनराव चटप रिंगणात नव्हते. पण यावेळी ते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने येथे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.