पार्थ पवारांच्या नाराजीबाबत पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया

आजोबांनी खडसावल्यामुळे पार्थ पवार नाराज

Updated: Aug 14, 2020, 06:18 PM IST
पार्थ पवारांच्या नाराजीबाबत पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं वक्तव्य त्यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. शरद पवार यांनी खडसावल्यानंतर पार्थ पवार कमालीचे नाराज झाले. तसंच यामुळे पार्थ पवार मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत असल्याची माहितीही समोर आली. 

पार्थ पवार यांच्या नाराजीबाबत आत्तापर्यंत राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाने मौन बाळगलं होतं. पण आता पार्थ पवार यांच्याविषयी पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया आली आहे. पार्थ पवार हा गुणी मुलगा आहे. पार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, तर त्यांना नियम पाळायला हवेत, असं त्यांच्या आत्या आणि अजित पवारांची बहिण विजया पाटील म्हणाल्या आहेत. 

जाहीररित्या बोलल्यामुळे पार्थ काहीसे नाराज आहेत. त्यांची कोणतीच घुसमट होत नाहीये. पार्थ हा खुप वेगळा आणि अत्यंत हळवा आहे. लोकांना काहीतरी विषय पाहिजे म्हणून चर्चा होत आहे, अशी प्रतिक्रिया विजया पाटील यांनी दिली. आजोबांचं बोलणं पार्थच्या जिव्हारी लागलं हे तुमचे ठोकताळा आहेत. पार्थ आताताईपणाने निर्णय घेईल, असं वाटत नाही, असंही विजया पाटील म्हणाल्या. 

सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतरही पार्थ पवारांची नाराजी कायम

राष्ट्रवादीमध्ये बैठकांच्या मालिका

शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीमध्ये बैठकांच्या मालिका सुरू झाल्या. बुधवारी शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर काहीच वेळात अजित पवार सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी पोहोचले. तिकडे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची बैठक झाली. यानंतर काल म्हणजेच गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवारांची भेट घेतली. 

काल संध्याकाळी सव्वा दोन तास पार्थ पवार हे सिल्व्हर ओकवर गेले. तिकडे सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांचं मन वळवण्याचाही प्रयत्न केला. तर आज मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार समर्थक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सुनिल तटकरे, धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे हे नेते शरद पवारांच्या भेटीला गेले होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांची मालिका सुरू असली, तरी या बैठका पार्थ पवार यांच्या नाराजीबाबत नसल्याचं पक्षाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.