सावंतवाडीमध्ये (Sawantwadi) एका विदेशी महिलेला जंगलाच्या मधोमध लोखंडी साखळीने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली आहे. मात्र या महिलेला जंगलाच्या मधोमध कोण घेऊन आलं? आणि तिला बांधून का ठेवलं? याची चर्चा रंगली असून, परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. महिलेची सुटका केल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सावंतवाडी रोणापाल सोनुर्ली गावाच्या मध्यभागी असलेल्या कराडीचे डोंगर या घनदाट जंगलात विदेशी महिला लोखंडी साखळीने बांधून ठेवलेल्या स्थितीत आढळून आली. सनिवारी सकाळी सोनुर्ली येथील गुराखी व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घनदाट जंगलात या महिलेला दोन ते तीन दिवस बांधून ठेवल्याची शंका आहे.
दरम्यान दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या जंगलात जाण्यासाठी रस्ता नसताना एवढ्या आतमध्ये तिला कसे व कोणी आणले हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या भागात गेलेल्या शेतकरी व गुराख्यांना कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी जंगलात जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला. यानंतर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली. महिलेला सध्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.