अमोल पाटील, झी मीडिया, रायगड : रायगड जिल्ह्यातील कर्जत, नेरळ भागातली जंगलं आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.. कारण या जंगलाला आता सिमेंटच्या जंगलाचा विळखा पडू लागलाय.. वनविभागाच्या जागेवर अनधिकृतपणे बंगले उभे राहू लागलेत.. मात्र तरी वनविभाग मूग गिळून गप्प आहे.
माथेरान पेब किल्ल्यालगतची वनराई.. इथला निसर्ग सगळ्यांनाच खुणावतो.. पण निसर्गाचं हे मोहक रुप काही दिवसांनी नष्ट होणार आहे.. आणि त्याला जबाबदार ठरणार आहे वनविभागाचा ढिसाळ कारभार.. ममदापूरमध्ये वनखात्याची खासगी वन जमीन येते.. खासगी वन जमीन म्हणजे ज्या जागेला वन अधिनियम 35 सेक्शन लागू झालाय अशी जमीन.. या जागेत कोणत्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही.. मात्र ममदापूरच्या खासगी वन जमिनीत चक्क बंगले उभे राहू लागलेत.. अनधिकृतपणे वृक्षतोड, जमीन सपाटीकरण असे प्रकार सर्रास होत असताना वनखातं मात्र मूग गिळून गप्प बसलंय..
बांधकाम झाल्यानंतरही अनेक जागांना 35 सेक्शन लागू झालाय.. त्यामुळे याबाबतही असं झालं का याची खातरजमा झी 24तासनं करण्याचा प्रयत्न केला.. त्यासाठी बंगल्याच्या मालकाची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला.. मात्र बंगल्याचा मालक बोलण्यास तयार होईना... अखेर झी मीडियाच्या प्रतिनिधींनी वनविभागाचं कार्यालय गाठलं.. 2014 रोजी संबंधीत बंगला मालकावर कारवाई केल्याचं अधिका-यांनी सांगीतलं मात्र कॅमेरॅसमोर बोलण्यास नकार दिला. खाजगी वन जमिनीत अशीच अतिक्रमणं होत राहिली तर जंगल नष्ट होईल अशी भीती व्यक्त करण्यात येते..
हा परिसर म्हणजे पर्यटकांचं आवडीचं ठिकाण.. इथल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक इथं हटकून येतात.. मात्र जंगलातील वाढत्या अतिक्रमणामुळे इथल्या पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे.. त्यामुळे वनविभागानं याकडे गांभिर्यानं लक्ष देण्याची गरज आहे..