घोटाळा लपवण्यासाठी वन अधिकाऱ्यांची केविलवाणी धावाधाव

वनविभागातील भ्रष्टाचाराची मलिका थांबताना दिसत नाहीय. केलेला घोटाळा लपवण्यासाठी कोल्हापूर-सांगली-सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची धावाधाव सुरु आहे.

Updated: Dec 12, 2017, 07:41 PM IST
घोटाळा लपवण्यासाठी वन अधिकाऱ्यांची केविलवाणी धावाधाव title=

प्रताप नाईक, झी मीडिया, सांगली : वनविभागातील भ्रष्टाचाराची मलिका थांबताना दिसत नाहीय. केलेला घोटाळा लपवण्यासाठी कोल्हापूर-सांगली-सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची धावाधाव सुरु आहे. चौकशी अधिकारी पोहचायच्या आधीच ‘तो मी नव्हेच’, अशा अविर्भावात इथले अधिकारी वावरत आहेतं. सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि सांगली वन परिक्षेत्रात अशाच पद्धतीचा प्रयत्न सुरु आहे.

वन क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार

कोल्हापूर आणि सातारा वन विभागात झालेल्या घोटाळ्याप्रमाणं सांगली वन विभागात शिराळा परिक्षेत्रातील ढगेवाडी, मरळनाथपूर तसंच सांगली परिक्षेत्रातील भोसे १ आणि भोसे २ या वन क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार झाल्याची बातमी झी मीडियानं पुराव्यानिशी दाखवल्यानंतर वन विभागानं चौकशी अधिकारी नेमून चौकशी सुरु केली. 

भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न

एकीकडे हा कारवाईचा फार्स सुरू असतानाच शिराळा आणि सांगली परिक्षेत्रातील अधिकारी भ्रष्टाचार लपवण्याच्या प्रयत्नात असल्याचं उघड झालंय. चौकशी अधिकारी पोहचण्या अगोदरच कामं प्रामाणिकपणे केल्याचा बनाव उघड झालाय. 

धावाधाव करुन काम केल्याचा बनाव

एकीकडे नियमबाह्य काम करून शासनाचे पैसे बेकायदेशीरपणे लाटायचे आणि दुसरीकडे चौकशी लागली की धावाधाव करुन काम केल्याचा बनाव करायचा प्रयत्न वनविभागाचे अधिकारी आनि कर्मचारी करत आहेत. पण झी मीडिया या सर्व बाबींकडे बारीक लक्ष ठेवून आहे.

चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक

झाडं लावण्यासाठी खोदलेल्या खड्डयांचं बनविलेलं चुकीचं एस्टीमेट, नियमाप्रमाणं ५० टक्के नदीकाठची गाळाची माती आणि शेण खत न घालता खड्ड्यात केलेलं वृक्षारोपण आणि मजुरांच्या नावे पैसे अदा न करता त्रयस्थ व्यक्तीच्या नावे मजुरीचं बिल काढून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी कोल्हापूरच्या मुख्य वनसंरक्षकांनी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली. पण हे अधिकारी किती ठिकाणी फिरून या सर्व बाबींचा आढावा घेऊन खरा अहवाल सादर करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.