नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुणे महापालिकेत आज वेगळाच थरार रंगला. मनसेच्या माजी नगरसेविकांनी शोलेस्टाईल आंदोलन केलं. एरवी आरोप प्रत्यारोपांनी गाजणाऱ्या पुणे महापालिकेच्या इमारतीत आज वेगळाच थरार रंगला.
महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत मनसेच्या दोन माजी नगरसेविका चढल्या आणि तिथून त्यांनी कठड्यावर पाय ठेऊन खाली उडी मारायची धमकी दिली.
महापालिकेच्या विविध विभागात स्मार्ट संस्थेच्या वतीने 230 हून अधिक महिला काम करतात. गेल्या 10 वर्षांपासून त्या कंत्राटी पद्धतीवर काम करतात. पण मागील काही महिन्यात त्यांचं काम बंद करण्यात आलं. त्यांचं वेतनही देण्यात आलं नाही. याच मागणीसाठी हे शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं.
दीड तासांहून अधिक काळ हे आंदोलन सुरू होतं. खाली उडी मारायची धमकी या नगरसेविका द्यायच्या तर खालून समर्थक घोषणाबाजी करत होते. फायर ब्रिगेडने खाली जाळीही धरली होती. पोलीसही आले होते. तरीही घोषणाबाजी सुरूच होती.
अखेर मनपा आयुक्त कुणाल कुमार यांनी 25 जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यावर नगरसेविका खाली उतरल्या, आयुक्तांनी दिलेलं आंदोलन पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा या नगरसेविकांनी दिला आहे.