मुंबई : मुंबईचा डबेवाला संघटनेचे (Mumbai Dabbawala Association) माजी अध्यक्ष सुभाष तळेकर (Subhash Talekar) यांना घाटकोपर पोलिसांनी (Ghatkopar Police) पुण्यातून (Pune) अटक केली आहे. सुभाष तळेकर यांच्यावर मुंबईच्या डबेवाल्यांची फसवणूक (Fraud) केल्याचा आरोप आहे. डबेवाल्यांना मोटरसायकल देण्याच्या नावाखाली कागदपत्रे जमा करुन त्यावर सह्या घेतल्या. भैरवनाथ नागरी पतपेढीतून कर्ज काढून मोटस सायकल न देता कर्जाची रक्कम परस्पर लाटली असा त्यांच्यावर आरोप आहे. सुभाष तळेकर यांना घाटकोपरमधील चिराग नगर पोलिसांनी काल रात्री गडत, ता. खेड जि. पुणे येथून अटक केली.
सुभाष तळेकर यांच्यावर डबेवाल्यांना मोफत दुचाकी देण्याच्या प्रकरणात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. ज्याअंतर्गत घाटकोपर पोलिसांकडून तळेकर यांना अटक करण्यात आली. फेब्रुवारी 2020 मध्ये घाटकोपर पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला होता. मुंबईच्या डब्बेवाल्यांनीच ही एफआयआर दाखल केली होती. त्यावेळी तळेकर मुंबई डबेवाला संघटनेचे पदाधिकारी होते. तेव्हा त्यांनी दुचाकी मोफत देण्याच्या नावाखाली डब्बेवाल्यांची काही कागदपत्र घेतली होती. पण, त्यानंतर डबेवाल्यांचा दुचाकी उत्पादक, विक्रेत्या कंपन्यांकडून फोन येऊ लागले.
नवी मुंबईतील एका पतपेढी संस्थेच्या मदतीने मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत टीव्हीएस मोपेड ही दुचाकी देणार असल्याचे सांगून सुभाष तळेकर याने साठ डबेवाल्यांकडून त्यांची कागदपत्रे गोळा केली होती. त्यानुसार काही डबेवाल्यांना दुचाकी मिळाल्या खऱ्या परंतु त्यांना आरटीओचा परवाना नव्हता. सोबतच अनेक डबेवाल्यांना दुचाकी तर मिळाली नाहीच. परंतु त्यांच्या खात्यातून पैसेदेखील वजा होऊ लागले. तसेच काही डबेवाल्यांना कर्ज फेडण्यासाठी पतपेढी करून फोन देखील येऊ लागले. आपली फसवणूक झाल्याचं कळतात काही डबेवाल्यांनी 4 फेब्रुवारी 2020 रोजी घाटकोपर पोलीस ठाण्यात सुभाष तळेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी अखेर सुभाष तळेकर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सुभाष तळेकर यांच्या व्यतिरिक्त डबेवाला असोसिएशनचे माजी सेक्रेटरी विठ्ठल सावंत, सदस्य दशरथ केदारे, साई इंटरप्राईजेसचे राकेश प्रसाद आणि भावेश दोषी यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास घाटकोपर पोलिस करत आहेत.