रवींद्र कांबळे, झी मीडिया सांगली : प्राणी आणि माणसाचं प्रेम दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र बैल आणि माणसाच्या नात्यातील प्रेमाची गोष्ट सांगणारी ही गोष्ट अक्षऱश: डोळ्यातून पाणी आणणारी आहे.
जेम्स श्वानाच्या निधनानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अनावर झालेला शोक आपण सगळ्यांनी पाहिला. सांगलीतल्या एका शेतक-यावरही तशीच शोकाकूल परिस्थिती ओढवली. कारण त्याच्या जिगरी दोस्ताचं, विक्रमवीर बैलाचं हार्ट अॅटॅकनं निधन झालं. गजा बैल आणि त्याच्या मालकाच्या दोस्तीची ही कहाणी.
सांगलीतल्या कसबे डिग्रज गावातल्या साईमते कुटुंबीयांनी आपला खास मित्र गेल्यानं हंबरडा फोडलेला. हा शोक आहे गजाच्या जाण्याचा होता. ज्याला दहा वर्षं जीवापाड जपलं, त्या गजा बैलाला अखेरचा निरोप देताना कृष्णा साईमते आणि त्यांच्या कुटुंबीयांना शोक आवरत नव्हता.
गजाचं वजन साधारण एक टन वजनाचं असावं. कुटुंबातील कृष्णा आणि गजा बैलाची दोस्ती तर गावात प्रसिद्ध होती. गजाच्या जाण्यानं 10 वर्षांची ही दोस्ती तुटली आणि दु:खाचा डोंगर कोसळला.
हा गजा साधासुधा बैल नव्हता सहा फूट उंची, दहा फूट लांबी आणि एक टन वजन. देशातला सर्वात मोठा बैल असा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गजाच्या नावानं नुकताच नोंद झाला होता. मात्र तो आनंद साजरं करण्याआधीच गजाला हार्ट अटॅक आला आणि हा देखणा, राजबिंडा बैल कायमचा जग सोडून गेला.
महाराष्ट्र-कर्नाटकातल्या अनेक कृषी प्रदर्शनात गजा बैलाचा डंका वाजला. कृष्णा साईमते यांनी गजाची नेहमीच चांगली बडदास्त ठेवली. त्याच्या खाण्या-पिण्यात कमी केली नाही. गोठ्यात गजासाठी खास फॅनही बसवला होता. विविध कृषी प्रदर्शनांमध्ये गजाला नेण्यासाठी त्यांनी काही वर्षांपूर्वी कर्ज काढून पीक अपची गाडी घेतली. गजाला प्रदर्शनात मिळणा-या पैशातून त्यानं मालकाच्या गाडीचं कर्जही फेडून टाकलं.
शेतक-यासाठी बैल म्हणजे जीव की प्राण असतो. त्यात गजासारखा लाडका बैल असेल तर त्या दुःखाला पारावारच राहत नाही. गजामुळं कृष्णा साईमतेंचं नाव महाराष्ट्रात गाजलं. त्यामुळे आपल्या या लाडक्या मित्राच्या आठवणी कायमस्वरूपी जतन करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. गजाच्या हाडांचा सापळा सांभाळून ठेवून त्याचं स्मारक उभारणार असल्याचं यावेळी कृष्णाने सांगितलं.