Ganeshutsav 2024 : करावं तरी काय? कोकणात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी; 'हे' रस्ते फुल्ल, विघ्न संपेना

Mumbai Goa Traffic Jam : गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेनं निघालेली अनेक मंडळी अद्याप गावांमध्ये पोहोचलेली नाहीत. वाहतूक कोंडीमुळं होतेय पंचाईत...  

प्रफुल्ल पवार | Updated: Sep 6, 2024, 10:33 AM IST
Ganeshutsav 2024 : करावं तरी काय? कोकणात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी; 'हे' रस्ते फुल्ल, विघ्न संपेना  title=
Ganesh Utsav 2024 Mumbai Goa highway traffic Live status google map

Mumbai Goa Traffic Jam : 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा मुहूर्त (Ganesh Utsav 2024 ) गाठत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणाच्या दिशेनं रवाना झाले आहे. मुंबई गोवा महामार्गासमवेत पर्यायी रस्त्यांवरही सध्या मोठ्या संख्येनं वाहनांची वर्दळ सुरू असून, त्यामुळं कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व वाटांवर कमालीची गर्दी पाहायला मिळत आहे. मंगळवारपासूनच कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आणि गुरुवारी रात्रीपासून हा ओघ आणखी वाढला. 

एसटी बस, खासगी वाहनं आणि चारचाकी गाड्यांपासून दुचाकीपर्यंत शक्य त्या सर्व माध्यमांचा वापर करत ही मंडळी कोकणात निघाली असली तरीही त्यांच्यापुढं असणारं वाहतूक कोंडीचं विघ्न मात्र काही केल्या कमी होण्याचं किंवा संपण्याचं नाव घेत नाहीय. एकिकडे रस्त्यांवर असणारे खड्डे, पावसामुळं झालेला चिखल आणि त्याच चिखलाडून कासवगतीनं पुढे जाणारी वाहनं असं चित्र असल्यामुळं वाहनधारकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

हेसुद्धा वाचा : Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा महामार्गच नव्हे, 'या' पर्यायी मार्गांनी गाठता येईल कोकण; Traffic Jam टाळण्यासाठी आताच पाहून घ्या

शुक्रवारी पहाटेपासूनट मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. वडखळ ते कासू , कोलाड, लोणेरे वाहतूक ठप्प असून, या वाटांवर हजारो वाहनं अडकल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी म्हणून रायगड पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, प्रवाशांनाही यंत्रणांसोबत सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे. 

का होतेय वाहतूक कोंडी? 

गणेशोत्सव काळात कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्या वाटेवर होणारी वाहतूक कोंडी ही काही नवी बाब नाही. पण, यंदा काही वेगळी कारणंही समोर आली आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील पहिल्या टप्प्यातील 50 टक्के काम अद्याप शिल्लक असलं तरीही महाड तालुक्यापासून दुसरा टप्पा तळ कोकणापर्यंत पूर्ण झाला आहे. यंदा गणेशोत्सवादरम्यान गावाकडे निघालेल्या अनेकांनीच या मार्गाला पसंती दिल्यामुळंच माणगाव, लोणेरे, टेमपाले भागामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी दिसत आहे. दरम्यानच्या वाटेत सुरू असणारी पुलांची कामं, रस्त्यांवरील खड्डे आणि पावसामुळं होणारा चिखल या संकटात आणखी वाढ करत असून, त्यामुळंच तीन ते पाच किमी अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.