गणेशोत्सव । कोकणमधील प्रमुख रस्त्यांची डागडुजी तातडीने पूर्ण करा - अशोक चव्हाण

 कोकणाकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला.

Updated: Jul 25, 2020, 07:35 AM IST
गणेशोत्सव । कोकणमधील प्रमुख रस्त्यांची डागडुजी तातडीने पूर्ण करा - अशोक चव्हाण title=

मुंबई : आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कोकणाकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यांचा आढावा घेऊन आवश्यकता असलेल्या रस्त्यांच्या डागडुजीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.

आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कोकणातील राष्ट्रीय महामार्गांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोकणातील राष्ट्रीय महामार्गांच्या जिल्हानिहाय स्थितीबाबत चारही पालकमंत्र्यांनी चव्हाण यांना अधिक माहिती दिली. तसेच रस्ता दुरूस्तीसंदर्भात अनेक सूचना मांडल्या. त्यानंतर बैठकीला संबोधित करताना सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले.

रस्ता कामांसाठी आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात पालकमंत्र्यांसह संयुक्तपणे दौरा करून प्रमुख रस्त्यांची पाहणी करण्याचे ठरले आहे. आवश्यकता असेल त्याठिकाणी रस्ते व पुलांच्या दुरूस्तीची कामे तातडीने सुरू करून गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी त्याची पूर्तता करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. 

तसेच पूर्वीपासून प्रगतीपथावर असलेल्या रस्त्यांची कामेदेखील विहित कालावधीत पूर्ण करून घ्यावीत. ज्या ठिकाणी कामे अधिक काळ चालणार आहेत, त्याठिकाणी वळण रस्ता सुस्थितीत असल्याची खातरजमा करून घ्यावी, असे चव्हाण यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.