Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक...; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीका

Sharad Pawar: या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण क्षेत्रात खूप काम केलं. त्याशिवाय त्यांनी आरोग्याचा दर्जा देखील सुधारण्यासाठी काम केलं. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 27, 2024, 07:16 AM IST
Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक...; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीका title=

Sharad Pawar: शुक्रवारी लोकसभेच्या निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला. तर दुसरीकडे उर्वरित टप्प्यांसाठी प्रत्येक पक्षाकडून प्रचार सुरु आहे. अशातच शुक्रवारी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी पवारांनी या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून देणं धोक्याचं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. 

सांगोल्याच्या सभेत काय म्हणाले शरद पवार?

या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण क्षेत्रात खूप काम केलं. त्याशिवाय त्यांनी आरोग्याचा दर्जा देखील सुधारण्यासाठी काम केलं. मात्र आत्ताच्या सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं आहे. मोदींच्या विरोधात केजरीवाल बोलले म्हणून त्यांना तुरुंगात जावं लागलं. हे पाहून आम्हाला लक्षात आलं की मोदी देशात हुकूमशाही आणणार आहेत. 

शरद पवार यांनी पुढे सांगितलं की, काही दिवसांपूर्वी परदेशी लोकांशी माझी भेट झाली. त्यावेळी मी त्यांना इथे का आलात असा प्रश्न केला असता, त्यांनी मला सांगितलं या देशात लोकशाही टिकणार की नाही हे बघण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे ही निवडणूक सोपी नसणार आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक आहे.

शेतकऱ्याचे नुकसान सरकार करतंय

या सभेमध्ये शरद पवार यांनी शेतीविषयीच्या प्रश्नांवर देशील भाष्य केलं. शेती व्यवसायाला जागतिक बाजारात भाव मिळत नाहीये. असं असताना निर्यातीला बंदी घालण्याची भूमिका या सरकारने घेतली. देशात सगळ्यात जास्त उसाचे उत्पन्न आणि दुधाचे उत्पन्न महाराष्ट्रात होत आहे. तरीही जागतिक बाजारातली व्यवसायाची संधी डावलून शेतकऱ्याचे नुकसान हे सरकार करतंय, असं शरद पवारांचं म्हणणं आहे.

गेल्या अडीच वर्षांमध्ये लोकशाहीची एकही निवडणूक झालेली नाही. पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका असेल, या निवडणुका सरकारने होऊ दिल्या नाहीत. देशात हे हुकूमशाहीचं सरकार परत येऊ द्यायचे नसेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन पवार यांनी केलंय.