आतापासूनच घरोघरी जा, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवा - शरद पवार

'जनसंपर्क कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून शिकायला हवे. त्यांच्यासारखी चिकाटी हवी,' असा सल्लाही शरद पवार यांनी दिला. 

Updated: Jun 6, 2019, 10:08 PM IST
आतापासूनच घरोघरी जा, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवा - शरद पवार  title=

पुणे : आतापासूनच मतदारांच्या घरी पोहोचा. जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवा.पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदाससंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार निवडून आले पाहिजे, त्यासाठी प्रभावीपणे काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भोसरी येथे कार्यकर्ता बैठकीत केले. त्याचवेळी त्यांनी 'जनसंपर्क कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून शिकायला हवे. त्यांच्यासारखी चिकाटी हवी,' असा सल्लाही यावेळी दिला. 

पवार यांचा पदाधिकाऱ्यांशी संवाद

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मतदार वेगळा विचार करतात. त्यामुळे लोकसभेच्या निकालामुळे खचून जाऊ नका. विधानसभेच्या तयारीला लागा. विधानसभेला जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी दिली, जाईल असेही शरद पवार यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांनी भोसरी एमआयडीसी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील तीनही विधानसभा मतदार संघातील निवडणूक रणनितीवर पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी यावेळी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता सोने, आजी- माजी नगरसेवक तसेच इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणुकीला केवळ ९८ दिवस

विधानसभा निवडणुकीला केवळ ९८ दिवस राहिले आहेत. त्यामुळे विधानसभेची खबरदारी तातडीने घ्यायची आहे. त्यामुळे आजपासूनच कामाला लागा. सर्वांनी एकत्र बसून जबाबदारी वाटून घ्या. त्यादृष्टीने कामाला लागा. जो प्रभाग दिला आहे. त्या प्रभागातील मतदारांची यादी तुमच्याकडे असली पाहिजे. कोण घरी आहे, कोण बाहेरगावी गेले आहेत. कोणाला भेटलात, कोणाला भेटला नाहीत त्याचे टिपण करा, प्रत्येक कुटुंबाची माहिती घ्या, असा सल्ला दिला.

'निवडणुकीत यश येणे अशक्य नाही'

तसेच प्रत्येकाला वैयक्तिक भेटा, आतापासूनच घरोघरी जाऊन मतदारांना भेटल्यास मतदार ऐनवेळी आठवण काढली का, असा प्रश्न लोक उपस्थित करणार नाहीत. त्यामुळे या कामाची सुरुवात आजपासूनच करा. असे केल्यास निवडणुकीत यश येणे अशक्य नाही. याची अतिशय गरज आहे, असे मार्गदर्शन शरद पवार यांनी केले.