विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : साडे-तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयदशमी अर्थात दसरा या सणाला घराघरात नवीन वस्तू, सोन्याचे दागिने खरेदी करण्यावर जास्त करून महिलांचा भर असतो. याच पार्श्वभूमीवर जळगावच्या सराफात ग्राहकांची लगबग दिसून येतेय.
आकर्षक सोन्याचं आपट्याचं पान, दागिन्यांची नवनवीन डिझाईन असलेले दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या सराफा बाजारात बरेच व्यवहार पार पडताना दिसत आहेत. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या विजयादशमीनिमित्त ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं. जळगावच्या प्रसिद्ध सराफा बाजारातही अशीच खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसते. दरवर्षी दसऱ्याला इथं सोने खरेदीत कोट्यवधीची उलाढाल होते.
सणाला खरेदी केलेलं सोनं घरात भरभराट आणणारं असतं त्यामुळे महिला तयार दागिन्यांसोबतचं सोन्याची आपट्याची पानंही खरेदी करतात. दसऱ्याच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन पूर्वसंध्येलाच अनेक महिलांनी सोन्याची बुकिंग करून ठेवलीय.
सोन्याची बाजारपेठ खरंतर पावसाच्या प्रमाणावरही तितकीच अवलंबून असते. त्यामुळं सराफांची जय्यत तयारी असली तरी यंदा जळगावात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यानं सोनेखरेदीला यंदा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावं लागले.