शरद पवारांकडून धनंजय मुडेंचा 'टप्प्यात कार्यक्रम'? परळीत मराठा कार्ड! तगडा उमेदवार सापडला?
Sharad Pawar Preparing For Big Fight: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या महत्त्वाच्या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल असा मतदारसंघांमध्ये परळीचाही समावेश होतो. मागील विधानसभेला या मतदारसंघात बहीण विरुद्ध भाऊ अशी थेट लढत झाली होती. फूट पडण्याआधीच्या राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या धनंजय मुंडेंनी भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडेंना धूळ चारली होती. मात्र मागील पाच वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी गेलं असून या भागातील राजकीय समिकरणं दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्याने पूर्णपणे बदलली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार परळीमध्ये मराठा कार्ड खेळण्याची शक्यता अधिक वाढली आहे. शरद पवार यांनी धनंजय मुंडेंविरुद्ध तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरु केली असून केवळ अजित पवार गटच नाही तर पवार या मतदारसंघात भाजपालाही घाम फोडतील अशी शक्यता सध्या तरी व्यक्त केली जात आहे. शरद पवार ज्या व्यक्तीच्या जीवावर राष्ट्रवादीमधील फुटीनंतरही गोपीनाथ मुंडेंचा हा बालेकिल्ला पुन्हा जिंकू इच्छितात त्या व्यक्तीचं नाव आहे, रावसाहेब देशमुख!
धनंजय मुंडेंची चिंता वाढली
आगामी विधानसबा निवडणूकीत पुन्हा एकदा परळीमध्ये विजयी पताका फडकावण्यासाठी शरद पवारांनी तयारी सुरु केली आहे. विद्यमान खासदार आणि अजित पवारांबरोबर बंडखोरी करणारे धनंजय मुंडेंना शह देण्यासाठी पवारांनी शड्डू ठोकत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शदर पवार या अत्यंत महत्त्वाच्या मतदरासंघात राजेसाहेब देशमुख यांच्या रुपात अगदीच नवा उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे. राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष आहे. राजेसाहेब देशमुख यांनी नुकतीच 'सिल्वर ओक'वर शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पवार परळीमध्ये मराठा कार्ड वापरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पवारांची ही खेळी धनंजय मुंडेंना महागात पडू शकते. सध्या धनंजय मुंडे हे परळीमधून आमदार असून महायुतीच्या सरकारमध्ये कृषीमंत्री आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षाला ही जागा आगामी निवडणुकीत सुटेल आणि या ठिकाणाहून पुन्हा धनंजय मुंडे हेच निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित मानलं जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन शरद पवारांनी या मतदारसंघासाठी विशेष नियोजन सुरु केलं आहे.
पवार एक पाऊल मागे की...
धनंजय मुंडेंचं तिकीट इथून जवळपास निश्चित मानलं जात असतानाच विद्यमान कृषीमंत्र्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात कोण आव्हान देणार? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात होता. आता परळी विधनसभा मतदारसंघाची परिस्थिती मागील काही दिवसांमध्ये अधिक स्पष्ट झाली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन परळीतून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्ती केली होती. मात्र परळी मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार हे अगदी निश्चित मानलं जात आहे. म्हणूनच काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख तुतारी हातात घेणार की शरद पवार एक पाऊल मागे जात 'लार्जर पिक्चर'चा विचार करुन ही जागा काँग्रेसला सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज सकाळीच रावसाहेब देशमुखांनी मुंबई गाठत शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली या भेटीत परळी मतदारसंघातील संभाव्य उमेदवारीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
राजेसाहेब देशमुख आहेत तरी कोण?
राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून गेले तीन टर्म जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून देखील राजेसाहेब देशमुख यांनी काम केलं आहे. अंबाजोगाई आणि परळी मतदारसंघातील काही भागांवर त्यांची चांगली वचक आहे. या भागात राजेसाहेब देशमुखांचा दांडगा जनसंपर्क आहे. राजेसाहेब देशमुख सतत्याने सामाजिक उपक्रम आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत असल्याने येथील जनतेमध्ये परिचयाचा चेहरा आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील पदं असो किंवा अगदी जिल्हापरिषद सभापती पदही त्यांनी भूषवलं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते परळी विधानसभा मतदारसंघांमधून विधानसभेची तयारी करत असून या भागाची खडान् खडा माहिती असलेला उमेदवार म्हणून त्यांची चांगलीच चर्चा असली तरी ते नेमके कोणाकडून लढाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
मराठा कनेक्शन काय?
लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजल्याचं दिसून आलं. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेलं आंदोलन त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींचा थेट फटका भारतीय जनता पार्टीला लोकसभेला बसल्याचं दिसून आलं. बीड लोकसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद थेट मतपेटीतून दिसून आल्याचं बोललं जात आहे. या वादाची झळ भाजपच्या पंकजा मुंडे यांना बसली. बीडमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे निवडून आले. माजी मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाला आणि संसदेत जाण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. अजूनही या भागामध्ये अरक्षणावरून सुरू झालेला वाद चर्चेत आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्येही या विषयाचा चांगलाच प्रभाव मतदानावर होईल असं सांगितलं जात आहे. होण्याची दात शक्यता आहे.
पवारांकडून धनंजय मुडेंचा 'टप्प्यात कार्यक्रम' निश्चित? तगडा उमेदवार सापडला?