खवैय्यांसाठी आनंदाची बातमी : पनवेलमध्ये मिसळ महोत्सव

पनवेलमधील मिसळ शौकीनांना या आठवड्याच्या अखेरीस विविध चवींच्या आणि विविध ठिकाणांच्या सुप्रसिद्ध अशा चटकदार मिसळ चाखण्याची संधी लाभणार आहे. येत्या २८, २९ आणि ३० एप्रिल तसेच १ मे रोजी पनवेल येथील गुजराती हायस्कूलच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. चारही दिवस सकाळी आठ ते रात्रौ दहा वाजेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार आहे. नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, नारायणगाव, डोंबिवली, ठाणे या खास मिसळींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरातील सुप्रसिद्ध मिसळ बनवणारे उद्योजक आपल्या चटकदार आणि झणझणीत मिसळींसह या महोत्सवाला हजेरी लावणार असून तब्बल ७० पेक्षा अधिक चवींच्या विविध मिसळ या महोत्सवात खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत.

Updated: Apr 27, 2018, 06:50 PM IST
खवैय्यांसाठी आनंदाची बातमी : पनवेलमध्ये मिसळ महोत्सव title=

पनवेल : पनवेलमधील मिसळ शौकीनांना या आठवड्याच्या अखेरीस विविध चवींच्या आणि विविध ठिकाणांच्या सुप्रसिद्ध अशा चटकदार मिसळ चाखण्याची संधी लाभणार आहे. येत्या २८, २९ आणि ३० एप्रिल तसेच १ मे रोजी पनवेल येथील गुजराती हायस्कूलच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. चारही दिवस सकाळी आठ ते रात्रौ दहा वाजेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार आहे. नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, नारायणगाव, डोंबिवली, ठाणे या खास मिसळींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरातील सुप्रसिद्ध मिसळ बनवणारे उद्योजक आपल्या चटकदार आणि झणझणीत मिसळींसह या महोत्सवाला हजेरी लावणार असून तब्बल ७० पेक्षा अधिक चवींच्या विविध मिसळ या महोत्सवात खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत.

खवय्यांची मोठी संख्या 

याशिवाय दही, ताक, चहा, कॉफी,ज्यूस, आईसक्रीम, डेझर्टस, मोदक, खरवस, पुरणपोळी, कुल्फी, फालूदा अशा इतर पदार्थांचेही स्टॉल्स या महोत्सवात खवैय्यांची रसना तृप्त करण्यास सज्ज असणार आहेत. त्यामुळे तरूणाईची पावलेही या महोत्सवाकडे वळणार यात शंका नाही. विशेष म्हणजे पनवेल येथील अनेक ठिकाणची मिसळ प्रसिद्ध आहे. तसेच पनवेलमध्ये खवय्यांची संख्या मोठी असल्याने या महोत्सवाला तुफान प्रतिसाद मिळेल. चार दिवसांत साधारण पंधरा हजार लोक या महोत्सवाला भेट देतील असा, आयोजकांचा अंदाज आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा मिसळ महोत्सव साकारण्यात आला आहे.