अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची स्वायत्तता रद्द करणारा जीआर मागे घेतल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. तसेच वादग्रस्त निर्णय घेणारे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनाही हटवण्याची घोषणाही त्यांनी केली. खासदार संभाजीराजे यांनी सुरु केलेलं उपोषण या निर्णयानंतर मागे घेतलं.
सारथी संस्थेची स्वायत्तता पुन्हा मिळवण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी पुण्यात सुरु केलेल्या आंदोलनात थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पोहचले आणि त्यांच्या मागण्याही मान्य केल्या. मराठा आरक्षण देताना या समाजातील तरुण, तरुणींच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी बार्टीच्या धरतीवर सारथी संस्था स्थापन करण्यात आली होती. युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांची फी, एमफील करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप आदी पद्धतीनं मदत करणाऱ्या या संस्थेला दिलेली स्वायत्तता प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी रद्द केल्यानं गेले काही दिवस आंदोलनं सुरु होती.
खासदार संभाजीराजेंनी या प्रकरणात लक्ष घातलं. त्यानंतर त्यांनी पुण्यात शनिवारी उपोषण सुरु केलं. एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन तर फोनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंशी चर्चा केली आणि या प्रकरणावर तोडगा काढला.
पुण्यातील आंदोलनात सारथीचे माजी अध्यक्ष सदानंद मोरेही सहभागी झाले होते. सारथीबाबतचे निर्णय घेताना संचालक मंडळाला अंधारात ठेवण्यात आले असा आरोप त्यांनी केला.
एकूणच गेले काही दिवस सारथीबाबत वाद आणि आंदोलनं सुरु होती. पण छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर सरकारनं तातडीनं दखल घेतली आणि मागण्या मान्य करून सारथीच्या वादावर तूर्तास पडदा टाकला.