माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची नात देवयानी पवार (Devyani Pawar) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (WEF) चमकणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आयोजित केलेल्या 'ग्लोबल शेपर्स अॅन्युअल समिट'मध्ये देवयानी पवार ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
2020 मध्ये स्थापन झालेल्या 'ग्लोबल शेपर्स कम्युनिटी'च्या (Global Shapers Annual Summit) बारामती हबमध्ये (Baramati Hub) क्युरेटर म्हणून काम पाहणाऱ्या देवयानी पवार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सप्टेंबरमध्ये जिनिव्हा येथे होणाऱ्या समिटमध्ये सहभागी होणार आहे.
“मी ३० वर्षाखालील युवा नेत्यांच्या मंचावर ग्रामीण भागाचे अभिमानाने प्रतिनिधित्व करेन. ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. मी माझे अनुभव सांगणार आहे, जे मला ग्रामीण लोकांसोबत काम करताना आले आहेत. त्यामुळे मी या कार्यक्रमात सहभागी होण्यास उत्सुक आहे, असे देवयांनी पवार यांनी म्हटले आहे.
“माझ्यासाठी, ग्रामीण युवक, स्थानिक प्रशासन आणि खाजगी संस्थांना एकत्रितपणे सहभागी करून सर्वसमावेशक, प्रगतीशील बनवून माझ्या समुदायावर प्रभाव पाडणे आणि प्रभाव निर्माण करणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मला वाटते की अशा प्रकारे भारत देश आणि त्यातील तरुण प्रगती करतील आणि अडथळे दूर करतील,” असेही देवयानी पवार म्हणाल्या.
या परिषदेमध्ये देवयानी पवार या 600 हून अधिक जागतिक स्तरावर काम करणाऱ्या लोकांसोबत विचारमंथन करणार आहेत. तसेच भविष्यातील सहयोगासाठी आणि प्रभाव निर्माण करण्यासाठी त्यांच्यासोबत मिळून काम करणार आहेत.
बारामती हबने केलेल्या उल्लेखनीय उपक्रमांपैकी सॅनिटरी पॅडचे वाटप आणि स्थानिक प्रशासन संस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपण मोहीम या दोन्हींचा समावेश या परिषदेमध्ये आहे.