पालकमंत्री अजित दादांचा पहिला बीड दौरा, जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार

 पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर जात असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

पुजा पवार | Updated: Jan 29, 2025, 07:32 PM IST
पालकमंत्री अजित दादांचा पहिला बीड दौरा, जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार title=
(Photo Credit : Social Media)

विशाल करोळे, बीड : संतोष देशमुख यांची हत्या त्यानंतर वाल्मिक कराडला झालेल्या अटकेनंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदाला तीव्र विरोध झाला. आणि राष्ट्रवादीनेही मुंडे यांना पालकमंत्री पदावरून दूर ठेवलं. तर अजित पवार स्वतः बीडचे पालकमंत्री झाले. आता पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर जात असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर बीडमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. देशमुखांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण झाल्यानंतरही आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. हत्या आणि खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. त्यानंतर धनंजय मुंडेंवर मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आलेत. धनंजय मुंडेंनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली.  त्यासोबतच धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात यावं अशी मागणीही विरोधकांनी केली. हा दबाव पाहाता राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवलं. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे बीडचे पालमंत्री झाले.. आता पालकमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर जाणार आहेत.. 30 जानेवारीला अजित पवार बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या प्रश्नांवर चर्चा होईल अशी माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. अजित पवारांनी बोलावलेल्या एका बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. अजित पवारांच्या बीड दौऱ्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. 

या सगळ्यात एक महत्वाची बाब म्हणजे बीडचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी 30 जानेवारीला बीडमध्ये येत आहेत. मात्र त्यांचे मंत्री धनंजय मुंडे मात्र दिल्ली दौऱ्यावर आहे. ते बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे. आता हा दोन दिवसांचा दिल्ली दौरा आधीच ठरला होता की सोयीने बैठकीला दांडी याचे उत्तर कदाचित धनंजय मुंडेच देऊ शकतील.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x