औरंगाबाद : भाजप प्रवेशासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी पाच कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.
हर्षवर्धन जाधव हे औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत. माझ्यासह 25 आमदारांना भाजप प्रवेशासाठी ऑफर दिली होती. गेल्या महिन्यातील दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांनी ऑफर दिल्याचं आमदार जाधव यांनी सांगितलं.
“महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या कुरबुरींमुळे भाजप त्रस्त आहे, असं मला चंद्रकांतदादा म्हणाले. त्यामुळे शिवसेनेचे काही आमदार गळाला लागतात का, यासाठी प्रत्येक आमदाराला पाच कोटींची ऑफर देऊन, त्यांना पोटनिवडणुकीत निवडून आणून, त्यांना भाजपमध्ये घ्यायचं आणि शिवसेनेला बाजूला सारायचं, असा आमचा प्रयत्न असल्याचं चंद्रकांतदादांनी मला सांगितलं. तिच ऑफर त्यांनी मलाही दिली होती. अशा पद्धतीने शिवसेनेचे इतर आमदारही सहभागी झाले तर शिवसेनेच्या दररोज होणाऱ्या त्रासातून आम्ही मुक्त होऊ, असं त्यांचं म्हणणं होतं.
या प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याच प्रयत्न केला. मात्र त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला