औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधवांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घडल्याचा अंदाज आहे. जाधवांच्या घराच्या काचा आणि घरासमोरील गाडी फोडण्यात आली आहे. हा दगडफेकीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारानंतर हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करणार आहेत. हल्ला झाला तेव्हा हर्षवर्धन घरी नव्हते. घरामध्ये त्यांची पत्नी आणि दोन मुलं होती. हल्लेखोरांनी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या, असा दावा संजना जाधव यांनी केला आहे. तसंच जवळपास १० मिनिटं हा हल्ला सुरु असल्याचं संजना जाधव यांनी सांगितलं आहे.
हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवरील टीका केली होती. जर शिवसेनेला मुस्लिमांचं वावडे आहे तर मग सत्तारांना शिवसेनेत कसे घेतले, असा सवाल करताना त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हर्षवर्धन जाधव हे कन्नड मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळत आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेही भाजपकडे असणारा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ स्वतःकडे घेत सत्तारांना उमेदवारी दिली. सत्तार यांच्या उमेदवारीवरून हर्षवर्धन जाधव यांनी टीका केली आहे.