Haryana Election Result 2024 Future of Maha Vikas Aghadi: हरियाणातील निकालानंतर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये अस्वथता दिसू लागली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेने खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी काँग्रेसला देशभरात स्वबळावर लढायचं असेल तर तसं जाहीर करावं असं म्हटलं आहे. तसेच ठाकरेंच्या पक्षाचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून, 'फाजित आत्मविश्वसा आणि स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे हरियाणात काँग्रेसचा पराभव झाला असून यातून महाराष्ट्रातील नेत्यांनी धडा घ्यावा' असं म्हणत राज्यातील नेत्यांचे कान टोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असं असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांच्या टीकेवर भाष्य केलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी, "ज्या राज्यात पक्ष कमजोर असतो त्या राज्यात काँग्रेसला स्थानिक पक्षांबरोबर निवडणूका लढायच्या असतात. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसला वाटतं की आपण मजबूत आहोत, आपली हवा आहे तिथे मात्र काँग्रेस आपल्या सहकाऱ्यांना लांब ठेवतो. त्याचा परिणाम हरियाणासारख्या निकालांमध्ये होतो याचा आता सर्वांनी विचार केला पाहिजे. हरियाणाचा निकाल बदलता आला असता. इंडिया आघाडीत निवडणुकीला समोरे गेलो असतो तर नक्कीच बदल दिसला असता," असं म्हटलं आहे.
काँग्रेसच्या हरियाणातील कामगिरीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी, "9 जागा कमी पडल्या, 25 जागा नाही कमी पडल्या. आम्ही निराश झालेलो नाही. यातून काँग्रेसला पण अनेक राज्यातील निवडणुकांमध्ये भूमिका घ्यावी लागेल. देशभरात स्वबळावर लढायचं असेल तर तशी भूमिका त्यांनी घेतली पाहिजे मग इतर पक्ष आपआपली भूमिका घेतील," अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, "कोणीही स्वत:ला मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ समजू नये," असंही राऊत म्हणाले.
"महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरद पवार आहेत हे एकनाथ शिंदेंनी विसरता कामा नये. जे हरियाणात घडलं आहे ते तिथपर्यंतच राहाणार. महाराष्ट्रात त्याचा परिणाम दिसून येणार नाही. इथे तुम्ही काहीही केलं तरी जिंकणार नाही. इथे आमची आघाडी आहे. आम्ही एकत्र आहोत. आम्ही एकत्र राहून निवडणूक लढणार आणि जिंकणार," असंही राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> निकाल हरियाणात भूकंप महाराष्ट्रात? ठाकरेंची सेना आक्रमक; म्हणे, 'काँग्रेसचा पराभव स्थानिक नेत्यांच्या..'
राऊतांनी केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना नाना पटोलेंनी महाविकास आघाडीच्या बैठकीत आपण संजय राऊतांबरोबर काँग्रेसवरील टीकेसंदर्भात तसेच 'सामना'मधील लेखासंदर्भात बोलणार असल्याचं पत्रकारांनी सांगितलं. "आता संजय राऊत बैठकीला आहे तर बैठकीमध्ये त्यांना विचारतो की त्यांनी अग्रलेख लिहिला हा मुद्दामून लिहिला की त्यांनी वस्तुस्थिती मांडली. मात्र ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती नाही," असं पटोले म्हणाले. "अशाप्रकारे अग्रलेखातून किंवा प्रतिक्रिया देऊन जाहीरपणे आघाडीमध्ये अशाप्रकारे बोलणं योग्य नाही," असंही पटोले म्हणाले.
इतक्यावरच न थांबता काँग्रेसने स्वबळाची भूमिका असेल तर तसं जाहीर करावं या राऊतांच्या विधानावर नाना पटोलेंनी, "आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार आहोत. कोणी मोठा भाऊ कोणी छोटा भाऊ नाही. आमच्यात काही वाद नाही. संजय राऊत यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू. कुणाचा चेहरा द्यायचा हे बैठकीत आम्ही चर्चा करू," असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हरियाणा निकालानंतर केलेल्या विधानावर बोलताना नाना पोटलेंनी, "अहंकार कोणाचा जास्त झाला आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसून येईल. त्यावेळेस समजेल की अहंकार कोणाचा खाली झाला. हरियाणाच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही," असं उत्तर दिलं.