प्राणीसंग्रहालयात हिटर... 'महाराजां'ची ऐट लय भारी!

यावर्षी थंडी उशिरा आली असली तरी थंडीने आता चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. मात्र, या कडाक्याच्या थंडीतही नागपुरातील महाराज बागेतील प्राणी सामान्य तापमानाचा आनंद लुटत आहेत. 

Updated: Dec 27, 2017, 09:21 PM IST
प्राणीसंग्रहालयात हिटर... 'महाराजां'ची ऐट लय भारी! title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : यावर्षी थंडी उशिरा आली असली तरी थंडीने आता चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. मात्र, या कडाक्याच्या थंडीतही नागपुरातील महाराज बागेतील प्राणी सामान्य तापमानाचा आनंद लुटत आहेत. 

नागपूरच्या महाराज बागेतील वाघ पर्यटकांना सतत इकडून तिकडे अगदी ऐटीत घिरट्या घालताना दिसतोय. या प्राण्यांना बघायला येणारे अंगात स्वेटर किंवा जॅकेट घालून आलेत... कारण हुडहुडी भरविणारी थंडी सध्या नागपुरात आहे. मात्र, या वाघोबाला मुळीच चिंता नाही कारण याला उष्णता देण्यासाठी आणि तापमान सामान्य ठेवण्यासाठी इथे हिटर लावण्यात आलेत. मजा फक्त याचीच आहे असं नाही इतर प्राण्यांच्या पिंजऱ्यासमोरही असे हिटर लावण्यात आले आहेत.

येथील पिंजऱ्यात राहणाऱ्या प्राण्यांवर थंड हवेचा सरळ परिणाम होऊ नये म्हणून पिंजऱ्याना पोती आणि कापडाने झाकण्यात आलंय. थंडीच्या दिवसात प्राण्यांच्या आहारात बऱ्यापैकी वाढ होत असल्याने चांगल्या आरोग्यासाठी या प्राण्यांना औषधीयुक्त जेवण दिलं जातंय, अशी माहिती डॉ. अभिजित मोटघरे यांनी दिलीय. 

महाराजबागेत सध्या २ वाघ, ८ बिबट, १ अस्वल, १३ हरीण, १३ नीलगाय आणि १६ काळवीट आहेत. हरीण, नीलगाय, काळवीट  यांच्यासाठी झाडांचा पालापाचोळा गोळा करून उबदार बेड तयार करण्यात आला आहे. या सर्व जनावरांना थंडीपासून बचावासाठी महाराजबाग प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे प्राणी थंडीतही सामान्य वातावरणाचा अनुभव घेत आहे हे मात्र नक्की...