पावसाचा फटका, कोकण रेल्वेची वाहतूक तीन तास ठप्प

मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला. त्यामुळे चार गाड्या कोलाड, वीर आणि करंजाडी येथे थांबविण्यात आल्या होत्या. तीन तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प होती.  

Updated: Jul 27, 2019, 05:32 PM IST
पावसाचा फटका, कोकण रेल्वेची वाहतूक तीन तास ठप्प title=

रत्नागिरी, रायगड : मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला. त्यामुळे तीन गाड्या कोलाड, वीर आणि करंजाडी येथे थांबविण्यात आल्या होत्या. तीन तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प होती. माणगावमधील घोट नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होते. त्यामुळे रत्नागिरी - दादर ही लोकल वीर येथे तर दिवा - सावंतवाडी ही गाडी कोलाड येथे थांबविण्यात आली होती. मंगला एक्स्प्रेस ही गाडी करंजाडी येथे थांबवून ठेवण्यात आली. मांडवी एक्स्प्रेस रोहा येथे थांबविवली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तीन तासानंतर थांबविण्यात आलेल्या गाड्या आता मार्गस्थ करण्यात आल्या आहेत.

पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत असली तरी वाहतूक धिम्यागतीने सुरु आहे. कोकण रेल्वेच्या रुळावर पाणी आल्याने कोकण रेल्वेची थांबविण्यात आली होती. घोड नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर माणगाव स्थानकातून मडगाव - दिवा पॅसेंजर रवाना करण्यात आली आहे.

रायगड - पोलादपूर तालुक्यातील माटवण इथल्या मोरीवरून सावित्री नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे पंचक्रोशीतील सवाद, धारवली, कालवली, वावे, हावरे आदी गावांशी संपर्क तुटलाय.. पोलादपूरमध्ये पावसाचा जोरही वाढला होता. 

गेल्या सहा तासांपसून चिपळूण - कराड मार्गावरची वाहतूक पुराच्या पाण्यामुळे ठप्प झाली होती. अखेर खेर्डी आणि बहदूरशेख नाका येथील पाणी कमी झाल्यावर इथली वाहतूक पूर्ववत करण्यात आलीय.  खेर्डी बाजारपेठेत भरलेलं पाणी आता ओसरायला सुरुवात झालीय. मात्र बाजारपेठेतील दुकानात पाणी गेल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी १४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात  चिपळूण तालुक्यात सर्वाधिक पाऊस म्हणजे २३५ मिलिमीटर पाऊस पडला तर दापोली तालुक्यात २२७ मिलिमीटर, मंडणगड तालुक्यात २०५ मिलिमीटर, तर खेड तालुक्यात १९० मिलिमीटर आणि संगमेश्वर तालुक्यात १६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर सर्वात कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात ३१ मिलिमीटर  इतका झाला आहे.