पुणे: सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या लवासा सिटीत जोरदार गारपीट झाली. तसंच सर्वांच्या पसंतीचं पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळ्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली.
दरम्यान, रायगड जिल्हयाच्या काही भागाला अवकाळी पावसाने झोडपलं. जिल्हयाच्या महाड पोलादपूर तालुक्यात दुपारनंतर वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. पोलादपूर तालुक्यातील कामथी परीसरात गारांचा पाउस झाला. आजच्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असला तरी यात आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान झालं. याशिवाय वीटभटटयांना या पावसाचा फटका बसला आहे. महाडमध्ये छपरं उडून घरांचे नुकसान झालं. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. सकाळपासूनच जिल्हयाच्या सर्वच भागात ढगाळ वातावरण होतं. दुपारी दक्षिण रायगडात पावसाने हजेरी लावली उत्तर रायगडात संध्याकाळी वादळी वा-यासह पाउस बरसला.