Maharashtra Rain Alert: बाप्पाच्या आगमनाला पावसाने हजेरी लावली होती. आता बाप्पा निरोप घेत असतानाही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईसह पुण्यात गणेश विसर्जनाचा थाट काही वेगळाच असतो. या दिवशी लाखो भाविक विसर्जनासाठी येत असतात. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुका तर, मुंबईत लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकांसह इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचीही मिरवणुका निघणार आहेत. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांना पाऊसही हजेरी लावणार आहे. 28 सप्टेंबर रोजी म्हणजेच गुरुवारी हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.
पुढील तीन दिवसांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा यांचा समावेश आहे. 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, अमरावती आणि इतर सात जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. यावेळी वेगाने वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात चांगला पाऊस झाला आहे. मागील 24 तासांत चिंचवड, तळेगाव जिल्ह्यात 50 mm पावसाची नोंद झाली आहे. तर पाषण रोड परिसरात 43 mm पावसाची नोंद झाली कर शिवाजीनगरमध्ये 37.9 आणि कोरेगाव पार्कात 29 mm पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, 25 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. तर मंगळवारी बहुतांश भागांतून मान्सूनने परतीच्या प्रवासास सुरूवात केली आहे. मध्य पूर्व बंगालच्या उपसागरापासून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत आणखी एक चक्रीय स्थिती कार्यरत आहे. याशिवाय अंदमानच्या समुद्रावर असलेल्या चक्रीय स्थितीचे रुपांतर 29 सप्टेंबर रोजी कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. हा पट्टा उत्तर अंदमान समुद्रापासून ते मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात 24 तास कार्यरत राहणार आहे. यानंतर हा पट्टा पश्चिम उत्तर भागाकडे सरकणार आहे. या सर्व स्थितीचा परिणाम राज्यातील पावसावर होणार असून राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे.