Beed Loksabha Election: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत आणि अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 48 जागांपैकी 31 जागांवर विजय मिळवला आहे. एकंदरीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. यामध्ये महायुतीला बीडमधून मोठा धक्का बसला. बीड लोकसभा मतदारसंघातून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंना विजयी घोषित करण्यात आलं. बजरंग सोनवणे यांनी 6 हजार 585 मतांनी पंकजा मुंडेंना पराभूत केलं. नेमका बीडच्या मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा झाला तो पाहूया.
बीडमध्ये मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीपासूनच पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये चुरस पाहिला मिळाली. प्रत्येक फेरीमध्ये आघाडी- पिछाडीवर बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे गेल्याचे पाहिला मिळालं. एकूण 32 फेऱ्यांपैकी 26 फेऱ्या पर्यंत ही परिस्थिती पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर बजरंग सोनवणे आघाडी घेतल्याचं समजलं.
अखेरच्या 31आणि 32 या दोन फेऱ्या बाकी असताना पंकजा मुंडे यांनी मतमोजणी केंद्रामध्ये अचानक एन्ट्री केली. मुंडेंनी काही वेळ त्यांनी केंद्रावरती पाहणी केली. यावेळी एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली या दोन्ही फेऱ्यांचे निकाल त्याचबरोबर पोस्टल मतदान याची फेर मतमोजणी व्हावी यासाठी पंकजा मुंडे यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे मागणी केली. मात्र ही मागणी फेटाळण्यात आली. या सर्व प्रक्रियेला काही तास लागले आणि त्यानंतर अखेरीस बजरंग सोनवणे यांना विजयी करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, केवळ पोस्टल मतदानास नाही तर बीड विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पुन्हा करण्याची मागणी पंकजा मुंडे यांच्या प्रतिनिधीकडून करण्यात आली होती. मात्र, 6000 पेक्षा जास्त मताने बजरंग सोनवणे हे निवडून आल्याचं सांगत त्यांची ही मागणी फेटाळून लावली होती.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी 68,1569 मतांनी विजय मिळवला आहे. पंकजा मुंडे यांनी 22 व्या फेरीपर्यंत तब्बल 38 हजार मतांची आघाडी घेतली होती, मात्र शेवटच्या काही निर्णायक फेऱ्यांमध्ये सोनावणे यांनी मुसंडी मारली. पण त्यानंतर मतमोजणी केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. शेवटच्या फेरीत पंकजा मुंडे यांना 67,4984 मतं मिळाली. बीडमध्ये सोनावणे यांनी 6,585 मतांनी विजय मिळवलाय. अखेर रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक लढतीत बजरंग सोनावणे यांचा विजय झाला.