पुणे : पुणेकरांना आणखी एक महागाईचा झटका बसला आहे. पुण्यात आज CNG च्या दरात (CNG Rate) मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. पुण्यात सीएनजीच्या दरात सलग चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात आज प्रति किलो 2.20 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता पुण्यात सीएनजीचा दर 77.20 रुपये प्रतिकिलो झाला आहे. हे वाढलेले दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. याआधी 6 एप्रिल, 13 एप्रिल आणि 18 एप्रिल रोजी येथे सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. (CNG Gas rate Increase in Pune)
एप्रिल महिन्यात, राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील व्हॅट 13 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर आणला होता, परिणामी 1 एप्रिलपासून सीएनजीचे दर 62 रुपये प्रति किलोवर आले होते, मात्र, त्यानंतर किमती सलग चार वेळा वाढल्या आहेत.
वाढत्या किमतींमुळे जागतिक बाजारपेठेत अॅडिटिव्ह गॅसचे दर वाढत असल्याचे बोलले जात आहे. त्याचा वापर सीएनजी बनवण्यासाठी होतो. त्यामुळे सीएनजीच्या दरातही वाढ होत आहे.
भारतात कतार, मस्कत आणि इतर अरब देशांमधून प्रति सिलेंडर २० डॉलर दराने सीएनजी खरेदी केली जात होती. पण रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांच्या किमती दबावाखाली आहेत आणि त्या सातत्याने वाढत आहेत. याचे कारण असे सांगितले जात आहे की, अनेक युरोपीय देशांनी आता अरब देशांकडून 40 डॉलर प्रति सिलेंडर दराने गॅस घेणे सुरू केले आहे, जे 20 डॉलरच्या तुलनेत दुप्पट आहे. अशा परिस्थितीत भारतीय डीलर्ससाठी ते खूप महाग होत आहे, त्यामुळे सीएनजीच्या किमती खूप वाढल्या आहेत. येत्या काही दिवसांत सीएनजी 80 रुपये प्रतिकिलो पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.