हिंदुस्थानी भाऊच्या अडचणीत वाढ, आता 'या' ठिकाणी गुन्हा दाखल

विद्यार्थ्यांना चिथावणी देणं आणि तोडफोड प्रकरणी हिंदुस्थानी भाऊवर आरोप

Updated: Feb 2, 2022, 03:13 PM IST
हिंदुस्थानी भाऊच्या अडचणीत वाढ, आता 'या' ठिकाणी गुन्हा दाखल title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊच्या (Hindustani Bhau) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ३१ जानेवारी रोजी नागपुरात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेच्या मागणीसाठी केलेलं आंदोलन आणि त्या दरम्यान झालेल्या तोडफोड प्रकरणी नागपूर पोलिसांनी हिंदुस्तानी भाईला आरोपी बनवलं आहे.

हिंदुस्तानी भाईच्या विरोधात नागपुरात गुन्हा दाखल झाला असून गरज भासली तर भविष्यात हिंदुस्तानी भाईला  ताब्यात घेऊ अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Nagpu Commissioner of Police Amitesh Kumar) यांनी दिली आहे.

नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि तोडफोड प्रकरणी त्याच दिवशी रात्री दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये विद्यार्थ्यांना चिथावणी देत रस्त्यावर उतरून आंदोलन करणं आणि हिंसा करणं यासाठी उद्युक्त करण्यामध्ये हिंदुस्तानी भाऊचा हात असल्याचे समोर आलं आहे. 

त्यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला विना परवानगी गर्दी करत आंदोलन करणं, कोरोना नियमांचा उल्लंघन करणे, दंगल करणे तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे या प्रकरणी आरोपी बनवले आहे.

भविष्यात गरज भासली तर विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाई ला नागपूर पोलीस ही ताब्यात घेईल अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्तांनी दिली आहे.