वर्धा : हिंगणघाट जळीतकांडातील मृत तरुणीवर दारोडा गावात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी गावकऱ्यांनाच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला शोक अनावर झाला होता. हिंगणघाटची लेक अनंताच्या प्रवासाला निघून गेली... मागे अनेक अनुत्तरीत प्रश्न ठेवून...
एका वेदनेचा असा दुर्दैवी अंत झाला. ३ फेब्रुवारीला हिंगणघाटच्या या लेकीला जिवंत जाळण्यात आलं. अखेर अग्नीनंच तिला कायमचं आपल्या कुशीत सामावून घेतलं. 'मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते.' या कवितेच्या ओळी दुर्दैवाने त्या मयत तरुणीच्या वाट्याला आल्या. तिचं सरणावर जळणारं पार्थिव पाहताना सगळ्यांचाच बांध फुटला. लाडक्या लेकीला अखेरचा निरोप देताना, अख्खा महाराष्ट्र हळहळला.
सोमवारचा दिवस उजाडला तोच तरुणीच्या मृत्यूच्या बातमीने तिच्या मृत्यूनंतर दारोडा गावात जनक्षोभ उसळला... संतप्त नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी नागपूर-हैद्राबाद महामार्ग रोखून धरला होता. दारोडा गावकरी एवढे संतापले होते की, आरोपी विकेश नागराळेला आमच्या ताब्यात द्या, त्यालाही जाळून ठार मारा, त्याशिवाय पार्थिव गावात आणू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता.
ज्या अँब्युलन्समधून तरुणीचं पार्थिव आणण्यात आलं, त्या अँब्युलन्सवर चिडलेल्या गावकऱ्यांनी दगडफेक केली. अँब्युलन्सची तोडफोड करण्यात आली. अखेर तरुणीच्या नातेवाईकांनी शांततेचं आवाहन केल्यानंतर तिचं पार्थिव घरी आणण्यात आलं. सफेद कापडात गुंडाळलेल्या लेकीला पाहून घरच्यांनी एकच हंबरडा फोडला.
तिला भावपूर्ण निरोप देण्यासाठी अवघी पंचक्रोशी दारोडा गावात लोटली होती. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले, आणि तिची झुंज कायमची संपली. ती गेली, पण अनेक प्रश्न मागे ठेवून...आणखी किती लेकींचा असा नाहक बळी घेणार? असा प्रश्न तिनं समाज नावाच्या व्यवस्थेला केलाय. निरपराध लेकींचा बळी घेणाऱ्या नराधमांना वचक कधी आणि कसा बसणार? असं आव्हान तिने सरकार नावाच्या यंत्रणेला दिलंय. समाज, सरकार आणि तुम्हा आम्हा सगळ्यांवर नापास असा शिक्का मारून ती तरुण शिक्षिका अनंताच्या प्रवासाला निघून गेली.
हिंगणघाटमधील तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी व्यक्त होत आहे.